धाराशिव (प्रतिनिधी)-पावसाळ्यात दडी मारलेला पाऊस हिवाळ्यात पडत आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार मंगळवारी पहाटे तास ते दीड तास पाऊस झाला. यामध्ये धाराशिव, परंडा, भूम, कळंब, वाशी तालुक्यातील 25 मंडळामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. यामध्ये 9 मंडळात सर्वाधिक 30 ते 40 मिमी पावसाची नोंद झाली आहे. यामुळे ऊस, द्राक्ष, कलिंगड, पपईसह इतर फळबागाचे नुकसान झाले आहे. तूर, कांदा, टोमॅटो, मिरचीसह इतर फळभाज्या व पालेभाज्यांचे नुकसान झाले आहे. उमरगा, लोहारा व तुळजापूर तालुका वगळता इतर तालुक्यात अवकाळी पाऊस झाला आहे. आगामी चार दिवसात पुन्हा वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
जिल्ह्यात मंगळवारी दि. 28 नोव्हेंबर रोजी धाराशिव, परंडा, भूम, कळंब, वाशी तालुक्यातील 25 मंडळात अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामध्ये धाराशिव तालुक्यातील जागजी, उपळा, शिंगोली, कारी नारी परिसर, आंबेजवगळे, जहागिरदारवाडी, तेर परिसरात द्राक्षाच्या बागांचे नुकसान झाले. परंडा, भूम, कळंब, वाशी तालुक्यातही द्राक्ष, पपई, कलिगंड, डाळींब पिकांचे नुकसान झाले आहे. काही शेतकऱ्यांनी द्राक्ष बागा धरल्या असून फुलधारणा झाली आहे. मात्र अवकाळी पावसामुळे फुलांच्या घडात पाणी साचून खराब होतात. या अवकाळी तडाख्यामुळे बहुतांश पिके व फळबागांचे नुकसान झाले आहे.
33 टक्केपेक्षा अधिक नुकसान झाल्यास मिळणार मदत
धाराशिव जिल्ह्यात 26 ते 28 नोव्हेंबर दरम्यान झालेल्या अवकाळी पावसाचे पंचनामे करण्याचे आदेश निवासी उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे यांनी दिली आहेत. पंचनाम्यात 33 टक्के पेक्षा जास्त नुकसान झालेल्या पिकांची गावनिहाय माहिती तत्काळ सादर करण्यास सांगितली आहे. 33 टक्के पेक्षा जास्त नुकसान झाल्यास राज्य आपत्ती विभागातून शेतकऱ्यांना मदत मिळू शकते.
तालुकानिहाय पाऊस
धाराशिव-18.6 मिमी, तुळजापूर-0.1 मिमी, परंडा-8.1 मिमी, भूम-8.0 मिमी, कळंब-17.2 मिमी, उमरगा-00.0 मिमी, लोहारा-0.1 मिमी, वाशी 11.1 मिलिमीटर पाऊस झाला आहे.