नळदुर्ग (प्रतिनिधी)- दिवाळीचा सण संपताच गावाकडे आलेले प्रवाशी अन चाकरमानी आपल्या कामावर परतु लागले आहेत. त्यामुळे दि.19 नोव्हेंबर रोजी नळदुर्ग बसस्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. बसमध्ये जागा मिळावी यासाठी बसस्थानकात बस आल्यानंतर बसमध्ये जाण्यासाठी प्रवाशांची झुंबड उडत आहे.

कोरोना तसेच अन्य कारणांमुळे गेल्या दोन चार वर्षात एसटी महामंडळ मोठ्या आर्थिक विवंचनेत सापडला होता. मात्र यावर्षी दिवाळी एसटी महामंडळाला पावली असल्याचे दिसुन येत आहे. सध्या प्रत्येक बसगडी प्रवाशांनी खचाखच भरून जात आहेत. एसटी महामंडळाने अनेक ठिकाणी प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन जादा गाड्या सोडल्या आहेत. त्यातच दिवाळी सनानिमित्त एसटी महामंडळाने बसच्या भाड्यामध्ये 10 टक्क्यांची वाढ केली आहे. याचाही फायदा एसटी महामंडळाला होत असल्याचे दिसुन येत आहे.

सध्या दिवाळीचा सण संपला आहे. दिवाळी सणासाठी गावी आलेले प्रवाशी व चाकरमानी आता आपल्या कामावर परतु लागले आहेत. त्यामुळे सध्या बसगाड्या फुल्ल भरून जात आहेत. दि 19 नोव्हेंबर रोजी नळदुर्ग बसस्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. नळदुर्ग बसस्थानक हे जवळपास 60 ते 70 खेडेगावांसाठी मध्यवर्ती ठिकाण आहे तसेच या बसस्थानकातुन राज्यात किंवा परराज्यात कुठेही आणि केंव्हाही जाता येते. त्यामुळे खेडेगावात आलेला प्रवाशी किंवा चाकरमान्यांला त्याच्या कामाच्या ठिकाणी परत जाण्यासाठी नळदुर्ग बसस्थानकातच यावे लागते.त्यामुळे गेल्या दोन, चार दिवसांपासुन नळदुर्ग बसस्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी दिसुन येत आहे. बसस्थानकात बसगाडी आली की बस पकडण्यासाठी प्रवाशी बसच्या पाठीमागे पळत जात आहेत. कारण येणारी बस प्रवाशांनी भरून येत आहे. त्यामुळे नळदुर्ग बसस्थानकात बसची वाट वाहत थांबलेल्या प्रवाशांना बस पकडण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन तुळजापुर, धाराशिव व उमरगा आगाराने अनेक ठिकाणी जादा बस सोडल्या आहेत. तरीही बसगाड्या अपुऱ्याच पडत आहेत. त्यामुळे बऱ्याच कालखंडानंतर एसटी महामंडळाला चांगले दिवस आले असल्याचे दिसुन येत आहे.


 
Top