नळदुर्ग (प्रतिनिधी)- मंगळवारच्या रात्री पडलेल्या तुफान अवकाळी पावसाने काटगाव परीसरात रब्बी पिकांची दाणादाण उडवुन दिली आहे. या अवकाळी पावसाचा दणका ऊस, कांद्यासह फळबागांनाही मोठ्याप्रमाणात बसला आहे.या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.प्रशासनाने तात्काळ या नुकसानीचे पंचनामे करावेत अशी मागणी शिवसेनेचे काटगाव विभाग प्रमुख धुळप्पा रक्षे यांनी केली आहे.

सध्या निसर्गाचा समतोल बिघडला असल्याचे दिसुन येत आहे. पावसाळ्यात दडी मारलेला पाऊस आता हिवाळ्यात पडत आहे. सोमवारी याच अवकाळी पावसाने महाराष्ट्राला झोडपुन काढले होते. यामध्ये धाराशिव जिल्हा बचावला होता मात्र मंगळवारी रात्री अवकाळी पावसाने अक्षरशा धाराशिव जिल्ह्याला झोडपुन काढले.

तुळजापुर तालुक्यातील काटगाव परीसरात मंगळवारी रात्री तुफान पाऊस झाला. ढगांचा गडगडाट तसेच विजांच्या कडकडाटासह रात्री एक ते पहाटे चार पर्यंत काटगाव,घट्टेवाडी, खानापुर, खडकी यासह परीसरातील गावात तुफान अवकाळी पाऊस झाला शेतात पाणी, रस्त्यावर पाणी सगळीकडे पाणीच, पाणी करून टाकले. या पावसामुळे रब्बी पिकांचे विशेष करून ज्वारी, गहु, हरभरा या पिकांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. सर्व पिके शेतात आडवी पडले आहेत. यापुर्वीच या भागांतील शेतकऱ्यांनी ज्वारीची दुबार पेरणी केली होती. मात्र या अवकाळी पावसाने त्यावरही पाणी फेरले आहे त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या काटगाव परीसरात ऊसतोड सुरू आहे., मात्र या पावसामुळे ऊसाच्या फडात पाणी थांबले आहे त्यामुळे मोठ्याप्रमाणात ऊस आडवा पडला असुन यामुळे ऊसाचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर ऊसाच्या फडात पाणी थांबल्यामुळे आता ऊसतोडही थांबणार आहे.

काटगाव शिवारात पडलेल्या तुफान अवकाळी पावसाचा फटका कांद्यासह फळबागांनाही मोठ्याप्रमाणात बसला आहे. द्राक्ष बागांचे या पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे त्याचबरोबर पपई, केळी या पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. पाऊसच इतका मोठा होता की क्षणात ओढे, नाले पाण्याने तुडुंब भरून वाहु लागले. या पावसामुळे जनावरांचा चाराही भिजला आहे त्यामुळे येणाऱ्या काळात पशुधन कसे सांभाळायचे हाही प्रश्न निर्माण झाला आहे. शेतातील बांध, नाले फुटले आहेत. त्यामुळे शेतकरी भांबावुन गेला आहे.


 
Top