धाराशिव (प्रतिनिधी) - राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) गटाच्या प्रभारी जिल्हाध्यक्षपदी संजय पाटील दुधगावकर यांची निवड करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी दुधगावकर यांना निवडीचे पत्र दिले.
राष्ट्रवादी पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदावर असलेले सुरेश बिराजदार यांनी अजित पवार यांच्या बंडानंतर राजीनामा दिला. काही दिवसांतच ते अजित पवार गटात गेल्याने पक्षाचे जिल्हाध्यक्षपद रिक्त होते. अखेर चार महिन्यांनंतर पक्षाने जिल्हा कार्याध्यक्षपदावर कार्यरत असलेले संजय पाटील दुधगावकर यांच्याकडे प्रभारी जिल्हाध्यक्षपद दिले आहे. आगामी काळात राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांचे विचार, ध्येय-धोरणे समाजात पोचविण्याचे आवाहन आमदार पाटील यांनी केले आहे. दुधगावकर यांनी यापूर्वी काँग्रेस पक्षात असताना जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपद सांभाळले होते.ते राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षपदावर होते.धाराशिव जिल्हयात त्यांची आक्रमक नेता, तसेच शेतकऱ्यांसाठी लढणारा कार्यकर्ता म्हणून ओळख आहे. संजय पाटील दुधगावकर यांच्या निवडीचे कार्यकर्त्यांतून स्वागत होत आहे.