भूम (प्रतिनिधी)- तालुक्यातील पन्हाळवाडी येथील सकल मराठा समाज बांधवांनी जांब - मात्रेवाडी मध्यम प्रकल्पामध्ये जल आंदोलन केले. बुधवार दि.1 ऑक्टोबर रोजी पन्हाळवाडी येथील युवकांनी हे आंदोलन केले.
सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आमरण उपोषण व साखळी उपोषण चालू आहे. तसेच अंतरवाली सराटी येथे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आमरण उपोषण आंदोलन चालू आहे. या आंदोलनास पाठिंबा म्हणून सकल मराठा समाजाच्या युवकांनी जांब मात्रेवाडी मध्यम प्रकल्पामध्ये जल आंदोलन केले. यावेळी मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ व शासनाच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या. यावेळी एक महिला भगिनी बातम्यांमध्ये मनोज जरांगे पाटील यांचा चेहरा पाहून या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी आल्या व त्या या आंदोलनामध्ये सहभागी देखील झाल्या. यावेळी युवकांनी त्यांचे टाळ्या वाजवून स्वागत केले.