धाराशिव (प्रतिनिधी) - जिल्हा नियोजन समिती ही संविधानिक समिती आहे.या समितीच्या बैठकांना माध्यमांच्या प्रतिनिधींना उपस्थित राहण्यास 9 जून 2005 च्या राज्य शासनाच्या अर्धशासकीय पत्राद्वारे मनाई आहे.जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयांची माहिती माध्यमांच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना व्हावी म्हणून या बैठकीनंतर एखादे बातमीपत्र प्रसिद्ध करण्यास किंवा पत्रकार परिषद बोलवून महत्त्वाच्या निर्णयांना प्रसिद्धी देण्यास हरकत नाही.याबाबत 9 जून 2005 च्या अर्ध शासकीय पत्राद्वारे सर्व पालकमंत्री तथा अध्यक्ष,जिल्हा नियोजन समिती यांना कळविण्यात  आले होते.

जिल्हा नियोजन समिती, धाराशिवच्या 16 ऑक्टोबर 2023 रोजीच्या बैठकीस माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित असल्याबाबत उपस्थित कोणत्याही लोकप्रतिनिधींनी सांगितलेले नाही.माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित असल्याची बाब जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आल्यानंतर ही बाब पालकमंत्री प्रा.डॉ. तानाजीराव सावंत यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली.त्यानंतर उपस्थित माध्यमांच्या प्रतिनिधींना जिल्हा नियोजन समितीची बैठक संपेपर्यंत सभागृहाबाहेर जाण्याची विनंती करण्यात आली.

पुढील जिल्हा नियोजन समितीच्या बैठकांना माध्यमांच्या प्रतिनिधींना उपस्थित रहावयाचे असल्यास त्यांनी तसे लेखी स्वरूपात प्रशासनाला कळवावे.त्यानंतरच माध्यमांच्या प्रतिनिधींचे प्राप्त झालेले निवेदन पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांच्या अवलोकनार्थ सादर करण्यात येईल.पालकमंत्री यांच्या मान्यतेने त्याबाबत कार्यवाही करण्यात येईल.असे जिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव,जिल्हा नियोजन समिती,धाराशिव यांनी कळविले आहे.   


 
Top