नळदुर्ग (प्रतिनिधी)- नवरात्र महोत्सवानिमित्त नळदुर्ग येथे जगदंबाबाई (अंबाबाई) देवस्थान ट्रस्ट संचलित श्री अंबाबाई मंदिर जीर्णोद्धार समितीच्या वतीने आयोजित केलेल्या “होम मिनिस्टर“ या कार्यक्रमात होम मिनिस्टर होण्याचा मान सौ. प्रमोदिनी ऋषिकेश बेले यांनी मिळविला आहे. त्यांना मंदिर समितीच्या वतीने मानाची पैठणी देण्यात आली. या स्पर्धेत दुसरा क्रमांक सौ. वर्षा सचिन डुकरे यांनी मिळविला आहे.
सालाबादप्रमाणे याहीवर्षी नळदुर्ग येथे नवरात्र महोत्सवानिमित्त जगदंबादेवी (अंबाबाई) देवस्थान ट्रस्ट संचलित श्री अंबाबाई मंदिर जीर्णोद्धार समितीच्या वतीने दि.18 ऑक्टोबर रोजी अंबाबाई मंदिराच्या प्रांगणात महिलांसाठी होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास शहरांतील महिलांचा उदंड प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या. होम मिनिस्टर कार्यक्रमाची रंगत डॉ. संतोष पवार यांनी या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन करतांना आपल्या बहारदार आवाजाने वाढविली. या स्पर्धेत संतोष पवार यांनी महिलांसाठी विविध खेळांच्या स्पर्धा घेतल्या.सर्व स्पर्धांमध्ये विजय मिळवीत अंतीम फेरीसाठी सौ. प्रमोदिनी ऋषिकेश बेले व सौ.वर्षा सचिन डुकरे या पात्र ठरल्या अंतीम फेरी अतीशय चुरशीची व रंगतदार झाली. या स्पर्धेत सौ. प्रमोदिनी ऋषिकेश बेले या नळदुर्गच्या होम मिनिस्टर ठरल्या. त्यांना मंदिर समितीच्या वतीने मानाची पैठणी देण्यात आली. तर या स्पर्धेत दुसरा क्रमांक सौ. वर्षा सचिन डुकरे यांनी मिळविला आहे. त्यांनाही मंदिर समितीच्या वतीने साडी देण्यात आली.
यावेळी अंबाबाई देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रमेश जाधव, सदस्य सुरेश गायकवाड, दत्तात्रय वाघमारे, माजी नगरसेवक बसवराज धरणे,विनायक अहंकारी, मारुती घाटे,गोटु जाधव, सौ. कविता पुदाले यांच्यासह नागरीक विशेष करून महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.