परंडा (प्रतिनिधी)- मराठा आरक्षणाची धग तीव्रतेने वाढत असून परंडा तालुक्यातील 96 गावांपैकी 60 गावांनी मंत्री, आमदार, खासदार यांना गावबंदी केलेली आहे. अनेक गावात कँडल मार्च होत आहे. 11 गावात साखळी उपोषण तर 4 गावात अन्नत्याग आंदोलन सुरु आहे .बससेवा बंद झाली असून प्रवाशांची गैरसोय झाली आहे. तर महारष्ट्र बंदचे आवाहन करण्यात आल्याने परंडा बंदचे आवाहन मराठा बांधवांनी केले आहे. मोटारसायकल, ट्रॅक्टर, जेसीबी रॅली तसेच मोर्चा काढून घोषणा देत परंडा तहसिलदार यांना लोणी, घारगाव, वाकडी, लोणी, पाचपिपळा, कुंभेफळ, कपिलापुरी, साकत (खु.) आदी गावांनी सोमवार दि.30 ऑक्टोबर रोजी निवेदन दिले.
तहसिल कार्यालय येथील मोदी सरकार तर चौकातील सावंत यांचे डिजिटल फाडले तसेच बसवरील महाराष्ट्र शासनाच्या जाहिरातीतील पंतप्रधान , मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या फोटोला काळे फासले. सिरसाव, जवळा, आसू, दुधी, डोण्जा, बंगाळवाडी, वाटेफळ, शेळगा, आनाळा, आवारपिंपरी, रोहकल या 11 गावांनी साखळी उपोषण सुरु केले आहे. तर नालगाव, आसू सिरसाव, कंडारी या 4 गावांनी अन्नत्याग केला आहे. ग्रामीण भागातून हजारो आंदोलक आले होते. परिसर विविध घोषणांनी व गर्दीने गजबजून गेलेला होता.