धाराशिव (प्रतिनिधी)-समाज कल्याण विभाग जि. प. धाराशिव व यश मेडिकल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दि. 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंती निमित्त महात्मा गांधी व्यसनमुक्ती सप्ताह 2 ऑक्टोबर ते 8 ऑक्टोबर दरम्यान जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येणार आहे. या सप्ताहाचे उद्घाटन यशवंतराव चव्हाण सभागृहात सकाळी 11 वाजता करण्यात आले कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी डॉ. कुलदीप मिटकरी कार्यकारी अभियंता ढवळे उपशिक्षणाधिकारी शिवाजीराव फाटक, समाज कल्याण निरीक्षक एम एस शिंदे, यश मेडिकल फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. संदीप तांबारे, सामाजिक कार्यकर्ते बालाजी पवार, समाज कल्याण विभागाचे लेखा अधिकारी सुधीर जाधवर आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात महात्मा गांधी व भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून करण्यात आली प्रस्ताविक करताना डॉ.संदीप तांबारे यांनी सप्ताह दरम्यान राबविण्यात येणाऱ्या महिला मेळावा, युवक मेळावा, कामगार कार्यशाळा, व्यसनमुक्ती चर्चासत्र इत्यादी उपक्रमाविषयी माहिती दिली. याप्रसंगी डॉ. संदीप तांबारे लिखित “झेप व्यसनमुक्ताची भविष्याकडे“ या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. शाहीर राणा जोगदंड यांच्या पथकाने व्यसनमुक्ती गीत सादर केले डॉ. कुलदीप मिटकरी यांनी महात्मा गांधीच्या विचारावर आचरण केल्यास आयुष्यभर कुठलेही व्यसन लागणार नाही अशी माहिती दिली. सूत्रसंचालन शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी दत्तात्रय जंगम यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समाज कल्याण निरीक्षक एम.एस.शिंदे व लेखाधिकारी सुधीर जाधवर वर यश मेडिकल फाउंडेशनचे राजेश तामाने, नानासाहेब देशमुख, अतुल चौधरी व राजकुमार मुंडे यांनी केले यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांना व्यसनमुक्तीची शपथ देण्यात आली.