धाराशिव (प्रतिनिधी)-धाराशिव शहरातील बाळासाहेब ठाकरेनगर येथील नवरात्र महोत्सव समितीच्या वतीने श्रीक्षेत्र येरमाळा येथून भवानी ज्योत आणून रविवारी सायंकाळी सौ. व श्री. प्रशांत साळुंके दाम्पत्याच्या हस्ते विधिवत घटस्थापना करण्यात आली. भवानी ज्योत मार्गावर ठिकठिकाणी फुलांच्या पायघड्या, रांगोळी आणि ढोल-ताशाच्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यामुळे ठाकरे नगरीत धार्मिक वातावरण निर्माण झाले होते.
धाराशिव येथील ठाकरेनगर नवरात्र महोत्सवाची परंपरा प्रशांत साळुंके यांनी गेल्या 23 वर्षांपासून अखंडितपणे जपली आहे. दरवर्षी महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठात स्वतः जाऊन श्री.साळुंके हे देवीचरणीचे कुंकू घेऊन घटस्थापनेच्या साहित्यासह देविभक्तांना वाटप करतात. यावर्षी मंडळाच्या वतीने कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराचा देखावा तयार करण्यात आला आहे. यावर्षी घटस्थापनेपासून घटोथापनापर्यंत सर्व धार्मिक विधी दुर्गांच्या हस्ते करण्यात येत आहेत. त्याचबरोबर महिलांसाठी विविध धार्मिक कार्यक्रम तसेच उद्योग सुरू करू इच्छिणाऱ्या महिला भगिनींकरिता व्यवसाय प्रशिक्षण आणि तात्काळ कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
त्याचबरोबर नवरात्र महोत्सव कालावधीत महिला,मुली व विद्यार्थ्यांसाठी विविध कलांचे प्रशिक्षण तसेच खेळाच्या स्पर्धा घेण्यात येणार आहेत. यामध्ये सुंदर हस्ताक्षर, रांगोळी, महिला व मुलींसाठी स्व संरक्षणाचे प्रशिक्षण, उद्योग आधार तसेच दांडिया प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर धावणे,संगीत खुर्ची, रांगोळी,पिठातील चॉकलेट शोधणे,लिंबू चमचा अशा स्पर्धा घेण्यात येत आहेत. तसेच महिलांसाठी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात आराधी गीतांचा मेळा,घागरी फुंकणे, कुंकू मार्चन, सप्तशती पठण असे विविध कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमाचा महिला भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन ठाकरेनगर नवरात्र महोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत साळुंके यांनी केले आहे. दरम्यान सोमवारी दुसऱ्या माळेदिवशी सकाळी सौ. व बाळासाहेब सिसरट यांच्या हस्ते देवीची मनाची भोगी पूजा करण्यात आली. तर सायंकाळी तहसीलदार शिवानंद बिडवे यांच्या हस्ते देवीची आरती करण्यात आली. यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.