उमरगा (प्रतिनिधी)- खाजगी मक्तेदारी संपवण्यासाठी व समाजहित जपण्यासाठी यशवंतराव चव्हाण व वसंतदादा पाटील यांनी सहकारी साखर कारखाने सुरू केले. स्पर्धेत विठ्ठलसाई कुठेही मागे राहणार नाही. सहकारी साखर कारखाने सभासदांच्या मालकीचे आहेत. जिल्ह्यात केवळ दोनच सहकारी साखर कारखाने आहेत. उर्वरीत सर्व सहकारी साखर कारखाने वेगळ्या परिस्थितीत आहेत. शेतकऱ्यांच्या आर्थिक भागभांडवलातुन उभारलेल्या सहकारी साखर कारखान्यावर शेतकऱ्यांचा हक्क असतो. अलीकडच्या काळात सहकारी संस्थांचे खाजगीकरण झाल्याने अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. परंतु शेतकऱ्यांच्या मालकीचे सहकारी साखर कारखाने टिकवणे गरजेचे असल्याचे मत कारखान्याचे चेअरमन बसवराज पाटील यांनी केले.

मुरूम येथील श्री विठ्ठलसाई सहकारी साखर कारखान्याच्या 30 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे शनिवारी (दि.30) आयोजन करण्यात आले होते. यावेळी अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर काशी, श्रीशैल्यम व उजैन पिठाचे विश्वस्त तथा जिल्हा बँकेचे चेअरमन बापुराव पाटील, कारखान्याचे व्हा. चेअरमन सादिकसाहेब काझी, काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश आष्टे, प्राचार्य डॉ. दिलीप गरुड, विकास हराळकर, माजी जिप सदस्य रफीक तांबोळी, माजी सभापती मदन पाटील, सचिन पाटील, योगेश राठोड, धनराज मंगरुळे, विलास शाळू, ॲड. विश्वनाथ पत्रिके, महेश माशाळकर आदीसह सर्व संचालक उपस्थित होते. 

पुढे बोलताना चेअरमन पाटील म्हणाले की, जिह्यात विठ्ठलसाई आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे दोन सहकारी कारखाने सुरु आहेत. खाजगीकरणाचा प्रचंड त्रास होणार आहे. मागील वर्षी सलग पाऊस लागल्यामुळे ऊस उत्पादनात घट झाली होती. तर या वर्षी पावसाच्या कमतरतेमुळे ऊसाचे उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. आपणाला सतत दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. सलग तीस वर्षे हा कारखाना बिनविरोध दिला हे सभासदांचे प्रेम आहे. बंद पडलेला किल्लारी साखर कारखाना चालवून तो सुस्थितीत आणलो. वेळेपूर्वी ऊस गाळपास पाठवण्यासाठी प्रयत्न करु नये. कोणीही घाई करु नये. हेक्टरी उत्पादन वाढेल व साखर उताराही चांगला मिळेल. कार्यक्षेत्रातील कोणाचाही ऊस शिल्लक राहणार नाही असे आश्वासन  पाटील यांनी यावेळी दिले. 

कार्यक्रमाच्या सुरुवातीला कार्यकारी संचालक एम. बी. अथणी यांनी श्रध्दांजलीचा ठराव मांडला व त्यानंतर अहवाल वाचन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन केन अकौटंट राजु पाटील यांनी तर ॲड. विरसंगप्पा आळंगे यांनी आभार मानले. यावेळी कारखान्याचे संचालक, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top