उमरगा (प्रतिनिधी)-जागतिक हृदयदिनचे औचित्य साधून उमरगा येथील उपजिल्हा रुग्णालयात हृदय विकाराची कारणे, उपाय व घ्यावयाची काळजी यावर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी रुग्णांची ईसीजी तपासणी करुन हृदयरोगासंबंधित तपासणी व उपचार करण्यात आले.

दरवर्षी 29 सप्टेंबर हा दिवस जागतिक हृदयदिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने उपजिल्हा रुग्णालय उमरगा येथे जागतिक हृदयदिन साजरा करण्यात आला. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनोद जाधव यांनी नागरिकांना मार्गदर्शन केले. हृदयाच्या आरोग्याबाबत लोकांना जागरूक करणे हा कार्यक्रमांचा मुख्य उद्देश आहे. ही एक जागतिक मोहीम आहे. सध्याच्या बदलत्या राहणीमानामुळे तरूणांना हृदयविकाराचा धोका असून त्यामुळे तरूणांना आपला जीव गमवावा लागत आहे. जोपर्यंत हृदयाचे ठोके आहेत तोपर्यंत आयुष्य आहे. म्हणून प्रत्येक व्यक्तीने हृदयाची काळजी घेणे आवश्यक आहे. एका संशोधनानुसार दरवर्षी 17 दसलक्ष लोकांचा मृत्यू हार्ट ॲटॅकमुळे होतो. हृदयविकार मुख्यतः चुकीचा आहार, तंबाखू, दारूचे सेवन,अति टेन्शन अशा अनेक कारणांमुळे होतो असे मार्गदर्शनात सांगितले. यावेळी डॉ. प्रविण जगताप, डॉ जगन्नाथ कुलकर्णी व डॉ. सोमनाथ कवठे यांनी उपस्थित नागरिकांची हृदयरोगासंबंधित तपासणी व उपचार केले यावेळी ईसीजी तंत्रज्ञ पदमाकर घोगे यांनी एकूण 106 रूग्णाच्या ईसीजी तपासण्या केल्या कार्यक्रम यशस्वीतेसाठी समुपदेशक अभय भालेराव, ईश्वर भोसले,गुंडू काळे, संदीप वाघमारे, नागराज तेलंग यांनी परिश्रम घेतले. सुत्रसंचालन पदमाकर घोगे यांनी तर आभारप्रदर्शन श्रीमती राखी वाले यांनी केले.


 
Top