भूम (प्रतिनिधी)-आई राजा उदो उदो च्या गजरात नगर जिल्हातून येणाऱ्या आई तुळजाभवानी देवीच्या मानाच्या पलंगाचे भूम शहरात दुपारी साडेबारा वाजता आगमण झाले. यावेळी दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. दसरा सणासाठी रुढी परंपरेनुसार नगर जिल्हातील भिंगार येथुन देवीचा हा मानाचा पलंग भूम मार्गे जाण्याची प्रथा आहे. रविवार दि 22 रोजी अष्टमीला साडेबारा वाजता या मानाच्या पलंगाचे बऱ्हाणपूर, उळूप मार्गे कसबा विभागात आगमण झाले. यावेळी हलगीच्या कडकडाटात वाजत गाजत हा पलंग पेठ विभागात दाखल झाला.
पेठेत गांधी चौक, निराळे खुठ, शाळु गल्ली मार्गे दत्तमंदीर समोरील सगरे यांच्या वाड्यासमोर एक तास विसावला. दुपारी या पलंगाचे शहरात आगमण होताच ठिकठिकाणी दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली. गांधी चौक, दत्त मंदीर, कसबा विभाग येथे मोठ्या प्रमाणात भाविकांनी गर्दी केली होती. दुपार नंतर शिवाजी नगर येथील मैदर्गे यांच्या घरासमोर हा मानाचा पलंग दाखल झाला. येथे परंपरेनुसार आरती पुजा करून बार्शी मार्गे तुळजापूरकडे हा पलंग मार्गस्थ झाला. हा पलंग डोक्यावर घेवुन जलद चालण्याची प्रथा आहे. पलंगासोबत मोठ्या संख्येने पायदळ भाविक चालतात. नवव्या माळेला हा मानाचा पलंग तुळजापूर येथे पोहचतो. हा मानाचा पलंग घोडेगाव येथून श्री तीर्थक्षेत्र तुळजापूर येथे नेण्याचा मान नगर येथील पलंगे कुटुंबीयांना परंपरेनुसार देण्यात आलेला आहे. या पायी पलंगाची परंपरा यादव काळापासून चालत आलेली आहे. या मानाच्या पलंगावर दसरा ते कोजागिरी पौर्णिमा या पाच दिवसांच्या दरम्यान श्रीदेवीजी श्रमनिद्रेत असतात. या मानाच्या पलंगाचा प्रवास ऋषीपंचमीच्या दिवशी घोडेगाव येथून सुरू होऊन दसऱ्याच्या आदल्या दिवशी तुळजापूर येथे संपतो.