भूम (प्रतिनिधी)- भूम तालुक्यातील पाथरूड येथील शेतकरी भगवान लक्ष्मण भसाड वय वर्ष 65  यांनी  कर्जबाजारीपणा व नापिकीला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली. ही घटना शनिवार दिनांक 21 रोजी घडली.

भगवान भसाड यांनी चिकणी वस्ती जवळील शेतामध्ये बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.  कर्जबाजारीपणामुळे त्यांना स्वतःचे राहते घर विकावे लागले होते. तसेच दीड एकर शेतामध्ये कमी पाऊस झाल्याने सोयाबीनचे पीक हातामधून गेले.  अद्यापही पेरनीसाठी पेरणीयोग्य पाऊस न झाल्यामुळे शेतीमध्ये पेरणी कशी करायची. अगोदरच कुटुंबीयांच्या डोक्यावरील छत कायमचे गेले. कुटुंबाचा उदरनिर्वाह या पुढील काळात भागवायचा कसा. या नैराश्येतून आत्महत्येचे पाऊल उचलले.  त्यांच्या पश्चात एक मुलगा, सून आणि पत्नी असा परिवार आहे. या घटनेमुळे गावामधून हळहळ व्यक्त होत आहे. सकाळी कुणालाही न सांगता  घरामधून गेल्यामुळे परिवारातील व्यक्तींनी शोध सुरू केले असता शेतामधील बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे लहान बंधू बिभिषन लक्ष्मण भसाड यांच्या लक्षात आले. त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांत दिली. मयत  भगवान भसाड यांचा मुलगा कोल्हापूर येथे पेढे विकण्यासाठी गेला असल्याने मुलगा आल्यानंतर रात्री उशिरा शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.


 
Top