धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्याच्या विकासासाठी तसेच विविध योजनांच्या लाभार्थ्यांसाठी यंत्रणांना जिल्हा नियोजन समितीकडून निधी उपलब्ध करून देण्यात येतो. यंत्रणांना देण्यात येणारा निधी यंत्रणांनी निर्धारित वेळेपूर्वीच खर्च करून जिल्ह्याच्या विकासाला गती द्यावी.असे निर्देश पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांनी दिले.   

आज जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या सभेत अध्यक्षस्थानावरून पालकमंत्री प्रा. डॉ.सावंत बोलत होते. सभेला खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार सर्वश्री विक्रम काळे, कैलास घाडगे-पाटील व राणाजगजितसिंह पाटील, जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता व पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.

पालकमंत्री प्रा.डॉ.सावंत म्हणाले, जिल्ह्यातील कोणतेही गाव स्मशानभूमीपासून वंचित राहणार नाही. जुन्या कर्मचाऱ्यांना काढून बाह्य यंत्रणेमार्फत नवीन उमेदवारांची भरती करण्यात येऊ नये. जिल्ह्याला जेवढा विजेचा पुरवठा लागतो, तेवढा वीज पुरवठा जिल्ह्याला लागतो तेवढा झाला पाहिजे. जिल्ह्यात आवश्यक तेवढे फिडर व ट्रान्सफॉर्मर उपलब्ध असले पाहिजे. नियोजन करून फिडर व ट्रान्सफॉर्मरची मागणी महावितरणने करावी. आवश्यक तेवढी ट्रांसफार्मर बँक जिल्ह्यात उपलब्ध असली पाहिजे,असे त्यांनी यावेळी सांगितले.  जिल्हाधिकारी डॉ.ओम्बासे यांनी यावेळी माहिती दिली.


53 कोटी 62 लाख रूपयापैकी 2 कोटी 91 लाख खर्च

जिल्हा वार्षिक योजना सन 2023 - 24 करिता 415 कोटी 98 लक्ष रुपये नियतव्यय मंजूर आहे. 83 कोटी 93 लक्ष रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून यंत्रणांना 53 कोटी 62 लक्ष रुपये निधी वितरित करण्यात आला आहे. यंत्रणांनी 2 कोटी 91 लक्ष रुपये निधी आतापर्यंत खर्च केल्याची माहिती जिल्हा नियोजन अधिकारी झाडे यांनी यावेळी दिली. सभेला विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.


 
Top