धाराशिव (प्रतिनिधी)- ठाकरेनगर नवरात्र महोत्सवाचे संस्थापक, श्री येडेश्वरी देवीचे भक्त प्रशांत साळुंके यांच्या वतीने महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तीपीठातून आणलेले हळद-कुंकू, ओटीभरण व घटस्थापनेसाठी लागणारे साहित्य घरोघरी वाटपाची परंपरा यावर्षीही कायम आहे. रविवारी (दि.15) सकाळी श्रीक्षेत्र येरमाळा येथील श्री येडेश्वरी देवी मंदिरातून भवानी ज्योत प्रज्वलित करुन धाराशिव येथे आणून सकाळी विधिवत घटस्थापना करण्यात येणार आहे.
शहरातील हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेनगर येथे दरवर्षी प्रशांत साळुंके यांच्या वतीने नवरात्र महोत्सव मोठ्या थाटामाटात, भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात येतो. आराधी, गोंधळी तसेच देवीभक्तांना महाप्रसाद वाटप, विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे नवरात्रोत्सवात आयोजन करण्यात येते. त्यामुळे ठाकरेनगर नवरात्र महोत्सवाची धाराशिवच्या देवी भक्तांमध्ये ओळख निर्माण झाली आहे. यंदाचे नवरात्र महोत्सवाचे 23 वे वर्ष आहे.
यावर्षी प्रशांत साळुंके यांच्या वतीने प्रभाग 4 मधील देवीभक्तांना महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठातील देवीच्या चरणावरील हळद-कुंकू, ओटीभरण आणि घटस्थापनेसाठी लागणारे सात धान्य, अगरबत्ती, कापूर, वात व इतर साहित्य घरोघरी देवीभक्तांना वाटप करण्यात येणार आहे.
तर घटस्थापनेसाठी शनिवारी सायंकाळी नवरात्रोत्सव मंडळाच्या पदाधिकारी, सदस्य व देवीभक्तांनी येरमाळा येथून भवानी ज्योत प्रज्वलित करुन आणल्यानंतर रविवारी विधिवत धार्मिक कार्यक्रमाने घटस्थापना करण्यात येत असल्याची माहिती प्रशांत साळुंके यांनी दिली.