धाराशिव (प्रतिनिधी)-  धाराशिव येथे 16 ते 20 नोव्हेंबर दरम्यान राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा स्पर्धा होणार आहे.या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी राज्यातील खेळाडू मोठ्या संख्येने येणार आहे.स्पर्धेसाठी येणाऱ्या खेळाडूंची गैरसोय होणार नाही यासाठी आवश्यक त्या सोयीसुविधा स्पर्धेसाठी उपलब्ध करून द्याव्यात. असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज 31 ऑक्टोबर रोजी धाराशिव येथे 16 ते 20 नोव्हेंबर 2023 दरम्यान होणाऱ्या 65 व्या वरिष्ठ गट गादी व माती राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी किताब 2023 च्या अनुषंगाने तयारीचा आढावा घेताना डॉ.ओम्बासे बोलत होते.

सभेला जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीकांत हरनाळे,जिल्हा नियोजन अधिकारी अर्जुन झाडे,सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस.के.चव्हाण, सार्वजनिक बांधकाम विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता सी.बी.चाकोते, महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता एन.आर.देशमुख, उप मुख्याधिकारी पी.एम पवार, जिल्हा तालीम संघाचे वामन गाते, आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अभिराम पाटील, श्री.शिंगाडे,डॉ.सुशील चव्हाण एस एम गोडभरले व पोलीस निरीक्षक  व्ही.बी. मोरे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

डॉ.ओम्बासे म्हणाले, कुस्ती स्पर्धेत सहभागी खेळाडू व त्यांचे सहकारी यांच्या वाहनासाठी पार्किंगची जागा निश्चित करण्यात यावी. कुस्ती स्पर्धा बघण्यासाठी येणाऱ्या प्रेक्षकांच्या वाहनांसाठी देखील पार्किंगचे स्थळ निश्चित करावे.स्पर्धेदरम्यान वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी होणार नाही याची दक्षता घ्यावी. खेळाडूंसाठी व त्यांच्या वाहनांसाठी पासेसची सुविधा करावी. त्यामुळे त्यांना पोलिसांकडून अडवणूक होणार नाही. क्रीडा स्पर्धेदरम्यान आरोग्य विभागाची सेवा उपलब्ध असावी. दोन रुग्णवाहिका क्रीडा स्पर्धेच्या ठिकाणी डॉक्टर्स, परिचारिका व आवश्यक कर्मचारी व औषधसाठ्यासह उपलब्ध करून द्याव्यात असे ते म्हणाले.

कुस्ती स्पर्धेच्या आयोजकांनी स्पर्धेसाठी लागणाऱ्या सुविधांची मागणी प्रशासनाकडे करावी असे सांगून डॉ.ओम्बासे म्हणाले,स्पर्धेच्या ठिकाणी सर्वत्र स्वच्छता असावी. पिण्याच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था करण्यात यावी.मातीची कुस्ती खेळणाऱ्या कुस्तीगिरांच्या कुस्ती होतास आंघोळीसाठी पाण्याची व्यवस्था असावी.तसेच मोबाईल टॉयलेटची व्यवस्था स्पर्धेच्या ठिकाण परिसरात असावी. नगरपालिका, क्रीडा विभाग आणि वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी स्पर्धेच्या ठिकाणी उद्या भेट देऊन परिसराची पाहणी करावी.कोणकोणत्या बाबींची आवश्यकता आहे ते आयोजकांना सोबत घेऊन बघावे.वीज वितरण कंपनीने कुस्ती स्पर्धेच्या ठिकाणी स्वतंत्र वीज जोडणी द्यावी तसेच जनरेटरची व्यवस्था स्पर्धेच्या ठिकाणी असावी असे यांनी यावेळी सांगितले.    

16 ते 20 नोव्हेंबर 2023 दरम्यान तुळजाभवानी स्टेडियम, धाराशिव येथे होणाऱ्या या कुस्ती स्पर्धा आणि महाराष्ट्र केसरी किताब लढतीत राज्यातील 980 खेळाडू स्पर्धक सहभागी होणार आहे.90 पदाधिकारी,150 पंच,25 तांत्रिक चमू राहणार आहे.17 विविध समित्या त्यासाठी गठीत करण्यात आल्या आहे.या स्पर्धेकरिता मातीचे दोन आणि गादीचे तीन आखाडे राहणार आहे.सकाळी 7 ते दुपारी 12 आणि सायंकाळी 6 ते रात्री 11 वाजतापर्यंत दोन शिफ्टमध्ये या स्पर्धा होणार असल्याची माहिती आयोजकांनी यावेळी दिली.सभेला कुस्ती स्पर्धेच्या आयोजन समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी त्यांनी स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी उपयुक्त सूचना सभेत मांडल्या.


 
Top