नळदुर्ग (प्रतिनिधी)- नळदुर्गच्या आठवडी बाजारात प्रचंड घाणीचे साम्राज्य असुन घाणीने भरलेल्या गटारी शेजारी बसुन भाजीविक्रेत्यांना भाजी विकावी लागत आहे यामुळे भाजीविक्रेत्याबरोबरच भाजी विकत घेणाऱ्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार यांनी याची दखल घेऊन निदान आठवडी बाजार भरण्याच्या दिवशी तरी ज्या ठिकाणी आठवडी बाजार भरतो तो परीसर स्वच्छ ठेवण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी होत आहे.
नळदुर्गचा आठवडी बाजार रविवारी भरतो. या आठवडी बाजारात खेडेगावातील शेतकरी तसेच भाजी विक्रेते नळदुर्ग शहरात येतात. मात्र ज्याठिकाणी आठवडी बाजार भरतो त्या ठिकाणी घाणीचे प्रचंड साम्राज्य आहे. पोष्ट ऑफिस, प्राथमिक आरोग्य केंद्र परीसर व कुरेशी गल्ली याठिकाणी जो आठवडी बाजार भरला जातो तो परीसर अतीशय अस्वच्छ आहे. गटारी घाणीने तुडुंब भरले आहेत. या घाणीने भरलेल्या गटारी शेजारीच बसुन भाजीविक्रेत्यांना भाजी विकावी लागत आहे. सर्वात गंभीर बाब म्हणजे या भाजी विक्रेत्यांना या घाणीने भरलेल्या गटारी शेजारीच बसुन दुपारचे जेवण करावे लागत आहे. हे ऐतिहासिक नळदुर्ग शहराला शोभणारे नाही. यामुळे शेकडो नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नगरपालिका आज स्वच्छतेच्या कामावर महिन्याला लाखो रुपये खर्च करीत आहे असे असताना आठवडी बाजारात इतकी घाण कशी काय याची चौकशी होणे गरजेचे आहे.
मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार यांनी या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन निदान आठवडी बाजारा दिवशी तरी हा परीसर स्वच्छ राहील याची काळजी घ्यावी अशी मागणी होत आहे.