धाराशिव (प्रतिनिधी)-अस्वच्छता, रोगराई, पाणी, बंद पथदिवे, खड्डेमय रस्ते यासह विविध नागरी समस्यांनी समता नगरवासीय  ग्रस्त झाले आहेत. याबाबत नगर परिषद प्रशासनाकडून कोणतीही उपाययोजना केली जात नसल्याने संतप्त नागरिक सोमवारी (दि.9) नगर परिषद कार्यालयात धडकले. मुख्याधिकारी वसुधा फड यांची भेट घेऊन 10 दिवसांत उपाययोजना करावी अन्यथा उग्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. 

समता गृहनिर्माण संस्थेचे चेअरमन नाना घाटगे व सचिव पंकज पडवळ यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाच्या वतीने मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. सोमवारी दिलेल्या निवेदनात म्हटले की, समता गृहनिर्माण संस्था ही मराठवाड्यातील सर्वात मोठी संस्था आहे. 7000 लोकसंख्या असलेल्या समता नगरमध्ये सध्या आठ ते नऊ दिवसांनी पाणी तेही कमी दाबाने येत आहे. त्याचीही वेळ निश्चित नसते. त्यामुळे समर्थ नगर  येथील पाण्याची टाकी सुरू करून किमान तीन दिवसाला पाणी पुरवठा करावा. सध्या दसरा, दिवाळी असे सणासुदीचे दिवस असल्याने एक दिवसआड पाणीपुरवठा करावा. नाल्याची स्वच्छता केल्यानंतर कचरा उचलण्यात येत नाही, तो कचरा उचलण्याची व्यवस्था करण्यात यावी, समता नगरात मोकाट डुकरांनी हैदोस घातला असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे, त्यामुळे डुकरांचा बंदोबस्त करावा आदी मागण्यां मांडण्यात आल्या आहेत.

निवेदनावर समता गृहनिर्माण संस्थेचे चेअरमन नाना घाटगे, सचिव पंकज पडवळ, कोषाध्यक्ष आयुब शेख, सदस्य सुरेश पुरी, शेषराव टेकाळे, मीरफारुखअली काझी, विठ्ठल खिचडे, रामचंद्र जोशी, बिभीषण माळी, नारायण पाटील, वासुदेव वेदपाठक, सुधीर जगदाळे, आसेफ मोमीन, सौ. सुरेखा गोकुळ कदम, सौ. वैशाली सुभाष पाटील, दगडू भोसले, अतुल पाटील यांच्यासह नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. 


 
Top