धाराशिव (प्रतिनिधी)-जिल्ह्याच्या भू-जल पातळीत मोठी घट झाली असून अल्प पर्जन्यमान, तलावातील अत्यल्प पाणीसाठा, खरीपातील घटलेले उत्पन्न व रब्बी हंगामातील पेरणीची अनिश्चितता यामुळे जिल्ह्यातील सर्व तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली असून जिल्हाधिकारी यांना सूचित केल्यानुसार त्यांनी दुष्काळी परिस्थितीचा अहवाल शासनास पाठविला आहे.

 धाराशिव जिल्हयात जुन ते सप्टेंबर महिन्यात सरासरीच्या केवळ 71 % च पर्जन्यमान झाले असून ऑगस्ट मध्ये केवळ 2 ते 3  दिवसच पाऊस झाला आहे. जिल्ह्यात सोयाबीन हे प्रमुख पीक असून तालुका कृषि अधिकारी यांचे अहवालानूसार सोयाबीन पिकाच्या अपेक्षित उत्पादनात 50 टक्के पेक्षा जास्त घट अपेक्षित असल्याने सोयाबीन पिका कारीता प्रधानमंत्री पिक विमा योजनेतील हंगामातील प्रतिकुल परिस्थितीमुळे झालेले नुकसान या तरतुदी अंतर्गत 25 टक्के अग्रीम मिळणेकरीता जिल्हाधिकारी यांनी अधिसूचना काढली आहे. 

अल्प पर्जन्यमानामुळे भूजल पातळी -1.64 मीटरने घटलेली आहे, जी मागील वर्षी या महिन्यात 1.68 होती. सर्वसाधारणपणे मे महिन्यात जाणवणारी पाणी पातळी ऑक्टॉबर मध्येच आपण अनुभवतोय. तसेच जिल्हयातील लघु, मध्यम व मोठया प्रकल्पात गतवर्षीच्या ऑक्टोबर महिन्यात 80% असलेला पाणी साठा आज केवळ 14.30 टक्केच आहे. त्यामुळे या भयावह परिस्थितीचा विचार करता जिल्ह्यातील सर्व तालुक्यात दुष्काळ जाहीर करणे अनिवार्य आहे.  

शासनाच्या प्रचलित धोरणा प्रमाणे दुष्काळ जाहीर करण्याच्या विहित कार्य पद्धतीनुसार दुष्काळाची कळ 1 व कळ 2 हे टप्पे केवळ धाराशिव, लोहारा आणि वाशी या तीन तालुक्यांमध्ये पूर्ण झाले आहेत.


 
Top