भूम (प्रतिनिधी)- भुम तालुक्यातील ईट येथे मंगळवार दि.23 रोजी पहाटे 2 ते अडीच वाजण्याच्या सुमारास वाढवणा रोडवरील बाळराजे देशमुख यांच्या बंगल्यावर अज्ञात चोरट्यांनी घरात घुसुन चोरी केल्याची घटना घडली आहे. यामध्ये लाखो रुपयांचा ऐवज गेल्याचे चर्चा होत आहे. ऐन दसऱ्याच्या पहाटे ईट येथे झालेल्या धाडसी चोरींमुळे नागरिकांत भितीचे वातावरण पसरले आहे.
बाळराजे देशमुख हे एका खोलीत व त्यांच्या आई, पत्नी व लहाण मुलगी दुसऱ्या खोलीत झोपलेले असताना पहाटे दोन ते अडीचच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी किचनचा दरवाज्याचा कडी-कोंडा तोडुन घरात प्रवेश केला. वरच्या मजल्यावर जाऊन बाळराजे देशमुख झोपलेल्या खोलीचा दरवाजाचा कोंडा बाहेरुन लाऊन घेतला. चारही चोरांनी तोंडाला रुमाल बांधले होते. त्यापैकी एका चोराने बाळराजे यांच्या पत्नीला धमकावत त्यांच्या तोंडावर चाकुने वार केला व तिजोरीच्या किल्ल्या घेऊन तिजोरी खोलुन त्यातील सोन्याचे दागीने घेऊन चोर बंगल्याच्या मागच्या बाजुस असलेल्या शेतातुन पसार झाले. या घटनेची माहिती कळताच पोलीस उपअधीक्षक जि. सी. हिरेमठ व वाशी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दसुरकर यांनी घटनास्थळी तातडीने भेट दिली.
यावेळी पोलीस उपनिरीक्षक घुले व पारा पोलीस चौकीचे जमादार पठाण व कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल होत घटनेचा पंचनामा केला. तसेच ठसे तज्ज्ञ व श्वान पथकाला पाचारन केले. ठसे तज्ज्ञाला दोन ठिकाणी चोरांचे ठसे सापडल्याचे पोलिसांनी सांगितले. श्वानाने वास घेत चोर ज्या शेतातुन पळाले व दागिन्यांच्या मोकळ्या डब्या व भांडे टाकुन दिलेल्या ठिकाणावर जाऊन थांबला. बाळराजे यांच्या पत्नीच्या तोंडावर चाकुने वार केल्याने त्यांना उपचारासाठी बार्शी येथे दाखल हलवण्यात आले आहे. वाशी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला.