तुळजापूर (प्रतिनिधी)-श्री. तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवात तुळजापूर येथे आज 24 ऑक्टोबर रोजी पहाटे 6 च्या सुमारास तुळजाभवानी मातेचा सीमोल्लंघनाचा सोहळा उत्साहात आणि जल्लोषात पार पडला.

श्री तुळजाभवानी मंदिरात पहाटे विधीवत पूजा व आरती करुन देवीचे माहेर असणाऱ्या नगरहून आलेल्या मानाच्या पालखीत देवीची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली.पिंपळाच्या पारावर देवीची पालखी टेकवून पुन्हा आरती करण्यात आली.मिरवणुकीनंतर प्रथेप्रमाणे पारंपारिक पध्दतीने मंत्रोपच्चार,आई राजा उदो उदोचा जयघोष आणि पारंपरिक संबळ वाद्याच्या साथीने सर्व विधी करण्यात आले.

श्री.तुळजाभवानी देवीची मूर्ती ही चल मूर्ती असल्याने ती आपलं सिंहासन सोडून सीमोल्लंघन करण्यासाठी भाविकांच्या बरोबर मंदिराच्या बाहेर येते.सीमोल्लंघनानंतर देवी पुन्हा पौर्णिमेपर्यंत निद्रा अवस्थेत जाते.यावेळी देवीच्या मुर्तीला इजा होऊ नये म्हणून 108 साडया परिधान करण्यात येतात.शेवटी प्रथेनुसार नगरच्या भक्तांनी श्रीदेवीजींची पालखी तोडून पालखीचे होमात विसर्जन केले. यावेळी सर्व भाविकांनी कूंकू व फुलांची उधळण करत आई राजा उदो-उदोचा जल्लोष केल्याने मंदिर परिसर दुमदुमून गेला.

यावेळी मंदिरातील धार्मिक कार्यक्रमास श्री. तुळजाभवानी मंदिरात जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष डॉ.सचिन ओंम्बासे,विश्वस्त आमदार राणाजगजितसिंह पाटील,जिल्हा पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, उपविभागीय अधिकारी योगेश खरमटे,तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) सोमनाथ माळी,मंदिर संस्थानचे सहायक व्यवस्थापक सिद्धेश्वर इंतुले,सहायक जनसंपर्क अधिकारी गणेश मोटे यांच्यासह महंत,उपाध्ये,भोपे,पाळीकर,पुजारी मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.


 
Top