भूम (प्रतिनिधी)- तालुक्यातील चिंचपूर येथील हायस्कूलचे शिक्षक रामकिसन लावंड यांच्या  चार चाकी गाडीला भीषण अपघात झाला. या अपघातात लावंड हे गंभीर जखमी झाले. या घटनेत गाडी जळून पूर्णपणे भस्मसात झाली आहे. ही घटना भूम ते धाराशिव रोडवर शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर शनिवार दि. 7 ऑक्टोबर रोजी रात्री नऊ ते साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली. 

लावंड हे तुळजापूर येथून भूमकडे येत होते. भूम येथून गावाकडे हाडोंग्री येथील रोहित बिडवे हा युवक चालला होता. यावेळी या तरुणाने त्या शिक्षकास जळत्या गाडी पासून बाजूला काढले. त्या युवकामुळे शिक्षकाचे प्राण वाचले. पिकअप वाहनाच्या साह्याने त्यांना भूम येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. घटनेची माहिती कळताच भूम नगरपालिकेची अग्निशमन दलाची गाडी तातडीने घटनास्थळी दाखल झाली या गाडीने आग विजवेपर्यंत गाडी पूर्णपणे जळून खाक झाली होती. भूम पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले.


 
Top