नळदुर्ग (प्रतिनिधी)- सध्या राज्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना टोलच्या मुद्यावरून आक्रमक झाली आहे. त्यातच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चारचाकी वाहने ही राज्यात सर्व टोल नाक्यावर टोलमुक्त केली आहेत अशी घोषणा केली. त्यानंतर दि.9 ऑक्टोबर रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पत्रकार परिषद झाली,अन त्या पत्रकार परिषदे मध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या सांगण्यानुसार सर्व राज्यातील टोलवर 2,3,4 चाकी वाहने ही टोल न घेता सोडावी व त्यासाठी सर्व महाराष्ट्र सैनिक टोल प्लाजावर जातील आणि हे वाहने टोल मुक्त करून सोडत आहेत की नाही हे बघतील अन हे करताना जर त्यांची अडवणुक केली तर आम्ही टोल नाके जाळून टाकु असा गंभीर इशारा सरकारला दिला होता. त्यानंतर राज्यभर मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले.

तुळजापूर तालुक्यातील सोलापूर - हैद्राबाद या राष्ट्रीय महामार्गवरील फुलवाडी टोल नाक्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते धडकले आणि त्यांनी सर्व चारचाकी वाहने टोल न घेता सोडली. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष महेश जाधव यांनी सरकार व टोल प्रशासनाला तीव्र शब्दात समज दिली. जिल्हा सचिव ज्योतिबा येडगे, नळदुर्ग शहर सरचिटणीस प्रमोद कुलकर्णी यांनी टोल प्लाजाला चारचाकी वाहने टोल मुक्त करून सोडावीत अन्यथा राज ठाकरे यांच्या आदेशाचे पालन केल्याशिवाय महाराष्ट्र सैनिक गप्प बसणार नाही असा इशारा दिला.त्यानंतर महाराष्ट्र सैनिकांनी शेकडो वाहने टोल न घेता सोडायला लावले.

यावेळी अविनाश साळुंखे, हरीभाऊ जाधव, अतुल जाधव, गणेश पाटील, राहुल गायकवाड, अलीम शेख, हेमंत बनसोड यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या सख्येने उपस्थित होते.सकाळपासूनच पोलीस निरीक्षक स्वप्नील लोखंडे यांनी टोलवर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला होता.


 
Top