धाराशिव (प्रतिनिधी)- अनेक वर्षांपासून धाराशिवकरांची लातूर-पुणे इंटरसिटी रेल्वेगाडीची मागणी होती. हरंगूळ-पुणे ही विशेष रेल्वेगाडी सुरू झाल्याने या मागणीला मूर्त रूप आले आहे. त्यामुळे सर्वसामान्य धाराशिवकर आणि व्यापारी बांधवांनी या नव्या विशेष रेल्वेगाडीचे मोठ्या जल्लोषात स्वागत केले. प्रवाशांनी उत्तम प्रतिसाद दिल्यास पुणे-लातूर इंटरसिटी कायम होईल असे मत कॅटचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष संजय मंत्री यांनी व्यक्त केले.
पुण्याहून मंगळवारी सकाळी ठीक सहा वाजता पहिल्या विशेष रेल्वेगाडीचे प्रस्थान झाले. हरंगूळच्या दिशेने निघालेली ही गाडी धाराशिव रेल्वेस्थानकात सकाळी ठीक पावणे आकारा वाजेच्या सुमारास दाखल झाली. रेल्वेगाडी स्थानकात दाखल होताच जोरदार घोषणांसह फुलांचा वर्षाव करीत या विशेष रेल्वेगाडीचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. मोटरमन गोरे, स्टेशनमास्तर श्री. मिनाजी आणि सुनील मिश्रा यांना बुके देऊन धाराशिवकरांच्या वतीने सन्मानित करण्यात आले.
या विशेष रेल्वेगाडीचा जास्तीत जास्त प्रवासी बांधवांनी लाभ घ्यावा, जेणेकरून दोन महिन्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या या गाडीचा प्रतिसाद पाहून या मार्गावर कायमस्वरूपी गाडी सुरू होण्याचा मार्ग प्रशस्त होईल असा आशावाद कॅटचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष संजय मंत्री यांनी व्यक्त केला. यावेळी ज्येष्ठ पत्रकार राजाभाऊ वैद्य, आकाशवाणीचे निवेदक दौलत निपाणीकर, पत्रकार रविंद्र केसकर, व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी शैलेश शहा, प्रमोद पडवळ, चंद्रकांत इंगळे, श्रीकांत शिंदे, गिरीश अष्टगी, बालाजी मगर, नितीन देशमुख यांच्यासह धाराशिवकर बहुसंख्येने उपस्थित होते.