धाराशिव (प्रतिनिधी)-धाराशिव नगर पालिकेमार्फत चौक सुशोभिकरण करत असताना शेजारील प्लॉट धारकाच्या वहिवाटीस अडथळा निर्माण होत असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) खंडपीठाने या प्रकरणात स्थगितीचा आदेश दिला आहे.
या प्रकरणात याचिकाकर्ते महेश हरिदास पवार यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, धाराशिव शहरातील सर्वे क्र.372/2 मध्ये नगर पालिकेच्या वतीने सुशोभिकरण काम करण्याचे काम ठेकेदाराला दिलेले आहे. या सुशोभिकरण कामामुळे याचिकाकर्ते महेश हरिदास पवार यांच्या प्लॉटसमोर मार्किंगच्या खुणा करून शहरातील सर्वे क्र. 372/2 मधील जागेत नगर पालिकेमार्फत चौक सुशोभिकारणाचे काम मंजूर करण्यात आले होते. या कामाला सुरुवात देखील करण्यात आली. परंतु सुशोभिकरणाच्या कामामुळे महेश हरिदास पवार यांच्या प्लॉटच्या वाहिवाटीचा रास्ता बंद होत असल्यामुळे त्यांनी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देऊन सदरील काम स्थगित करण्याची मागणी केली. त्याचबरोबर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने नगर परिषदेकडे दोन रस्त्यामधील जागेचे सुशोभिकरण करण्यासाठी नाहरकत दिली असली तरी याबाबत वैयक्तिक मालकीच्या जागेचे रस्ते बंद करून कंपाउंड बांधण्याबाबत कोणत्याही प्रकारचे नाहरकत दिलेले नाही, हे निदर्शनास आणून दिले. परंतु नगर पालिका प्रशासनाने दखल न घेतल्याने महेश पवार यांनी उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) खंडपीठात विधिज्ञ ए. डी. शिंदे यांच्यामार्फत याचिका दाखल केली होती.
या प्रकरणात धाराशिव नगर पालिका, संबंधित ठेकेदार आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांना प्रतिवादी करण्यात आले. याचिकेवर सुनावणी करताना खंडपीठाने सदरील कामास स्थगितीचे आदेश दिले आहेत. दरम्यान राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दिलेल्या नाहरकत प्रमाणपत्रातील अटींचे उल्लंघन केल्यामुळे आता महामार्ग प्राधिकरणाकडून नाहरकत प्रमाणपत्र रद्द करण्यात आलेले असल्याचे याचिकाकर्ते महेश पवार यांनी सांगितले.