धाराशिव (प्रतिनिधी)-धाराशिव आळणी येथील धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील श्री भैरवनाथ निसर्ग मंडळ संचलित औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात दरवर्षीप्रमाणे प्रथम वर्षात प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ संपन्न झाला.या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आर.पी.फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शेख गाजी व डॉ.दिनकर झेंडे यांची उपस्थिती होती तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री भैरवनाथ निसर्ग मंडळाच्या औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुरज ननवरे हे होते.
यावेळी डॉ.शेख यांनी मानवी आयुष्यात औषधाचे अनन्य साधारण महत्व व औषध निर्माण शास्त्रातील करिअरच्या वेगवेगळ्या संधीची माहिती सांगितली. तर डॉ.झेंडे यांनी प्रथम वर्षातील नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांना उपलब्ध शैक्षणिक सोयी सुविधांचा योग्य उपयोग करून आपले करिअर चांगल्या पद्धतीने कसे घडवावे याबद्दल माहिती दिली.
अध्यक्षीय समारोप करताना डॉ.सुरज ननवरे यांनी विद्यार्थ्यांना आवश्यक असणाऱ्या सर्व शैक्षणिक सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील असे आश्वासन दिले.तसेच विद्यार्थ्यांनी फार्मसी क्षेत्रात आपले करिअर निवड केल्याबद्दल विद्यार्थ्यांचे स्वागत करून फार्मासिस्ट या नात्याने रुग्णसेवेसाठी सदैव कटिबद्ध राहण्याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा.धस यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.नागरगोजे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री भैरवनाथ निसर्ग मंडळाच्या बी.फार्मसी व डी. फार्मसी शिक्षक, विद्यार्थी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.