धाराशिव (प्रतिनिधी)-मागील वर्षभर आपण देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केला. हे वर्ष महात्मा गांधींच्या स्मृतींचे 75 वे वर्ष आहे. आजपासून 75 वर्षांपूर्वी ज्या महात्मा गांधींना गोळ्या घालून संपविण्यात आले त्याच गांधींच्या प्रतिमेवर आजही काही माथेफिरू गोळ्या झाडत आहेत. मृत्यूनंतरही गांधींची यांना एवढी भीती का वाटते असा सवाल पत्रकार तथा कवी रवींद्र केसकर यांनी उपस्थित केला.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने डॉ.वेदप्रकाश पाटील शैक्षणिक संकुल येथे गांधी जयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते डॉ.प्रतापसिंह पाटील, राष्ट्रवादी युवक प्रदेश सचिव रोहित बागल, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शेखर घोडके,पंकज भोसले, प्राचार्य शेख गाजी,सुरज वडवले, कुणाल कर्णवर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यार्थी शहराध्यक्ष पृथ्वीराज मुळे यांची उपस्थिती होती.
सध्या देशभरात टोकाची अराजकता पसरली आहे. ती संपवून सुशासन निर्माण करायचे असेल तर पुन्हा एकदा महात्मा गांधी यांच्या विचारांची गरज असल्याचे प्रतिपादन केसकर यांनी व्यक्त केले. पुढे बोलताना केसकर म्हणाले की, महात्मा गांधी यांनी जगाला शांतता व अहिंसेचा संदेश दिला त्या तत्त्वाचे पालन विद्यार्थीदशेत होणे गरजेचे आहे. ज्या वयात गांधीजी कळणे आवश्यक आहे त्या वयातच राष्ट्रवादी युवक काँग्रेसने हा कार्यक्रम घेतल्याबद्दलही त्यांनी आभारही मानले. महात्मा गांधीचे विचार समजावून सांगत उपस्थित विद्यार्थ्यांना प्रेरित केले. वर्तमान स्थितीत माजलेली अराजकता पाहता आज खऱ्या अर्थाने या देशाला पुन्हा एकदा बापू समजून घेण्याची गरज असल्याचेही ते शेवटी म्हणाले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांनीही परिश्रम घेतले यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी व कर्मचारी उपस्थित होते.