धाराशिव (प्रतिनिधी) - जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची जनजागृती शेतकरी जनजागृती संवाद यात्रेच्या माध्यमातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे हे करीत आहेत. धाराशिव तालुक्यातील वरुडा येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा त्यांनी दि.11 ऑक्टोबर रोजी जाणून घेतल्या.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने शेतकरी जनजागृती संवाद यात्रा जिल्ह्यातील विविध ठिकाणी सुरु आहे. या दरम्यान शेतकरी वर्गातून भयंकर असंतोष दिसत आहे. तर यंदाचा रब्बी हंगाम पाऊस वेळेवर न आल्यामुळे पूर्णपणे वाया गेला असल्यामुळे शेतकरी खूप हवालदिल झाला असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच वर्षभर कष्टाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी उसाचे पीक कसेबसे जोपासले आहे. त्या उत्पादनामध्ये घट येण्याची शक्यता असून सोयाबीन व इतर पिके पूर्णपणे हातातून गेलेले असताना शेतकरी वर्गातून निदान ऊसाला तरी किमान 4 हजार रुपये प्रती टन भाव मिळाला पाहिजे अशी मागणी इंगळे यांनी केली. तर येत्या 17 तारखेला धाराशिव तालुक्यात ऊस उत्पादक शेतकरी व उसाच्या विविध प्रश्नांवरती ऊस परिषद व ऊस उत्पादक शेतकरी जनजागृती संवाद सभा आयोजित केली आहे. त्यामुळे धाराशिव तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसोबत त्यांनी संवाद साधला. यावेळी उपाध्यक्ष धनाजी पेंदे, सरपंच खंडेराव गाढवे, उपसरपंच सुनील गंगावणे, पृथ्वीराज मगर, सचिन शेंडगे, भारत गाढवे, आप्पा मगर, विनायक रोटे, दत्ता गाढवे, गणेश शरणागळे आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.