धाराशिव (प्रतिनिधी) कळंब तालुक्यातील मंगरूळ येथील भोसले कुटुंबातील मागील बारा वर्षांपासून कळंब न्यायालयात सुरू असलेला जमीनीचा वाद सलोखा योजनेतंर्गत महसूल विभागाच्या पुढाकाराने तलाठी श्री.सिरसेवाड यांनी मिटविला. त्यामुळे सलोखा योजनेमुळे भोसले शेतकरी कुटुंबाला तसेच अन्य शेतकरी कुटुंबाला दिलासा मिळाला असल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे.

या योजनेअंतर्गत शेतवहीवाटचे वाद, शेतातील अतिक्रमणावरून होणारा वाद,चुकीच्या नोंदीमुळे होणारे वाद,भावा भावातील वाटणीचा वाद, शासकीय योजनेतील त्रुटी किंवा प्रस्ताव अमान्यतेबाबतचा वाद, इत्यादी कारणामुळे शेत जमिनीचे वाद होतात. हे वाद संपुष्टात येऊन समाजामध्ये सलोखा निर्माण व्हावा व एकमेकाबद्दल जिव्हाळा निर्माण होऊन गावात शांतता नांदावी.यासाठी मौजे मंगरूळ येथील तलाठी डी.व्ही सिरसेवाड यांनी भोसले कुटुंबातील अनेक वर्षापासून शेतीच्या वहिवाटीबाबत कळंब येथील न्यायालयात सुरू असलेला वाद दोघांच्या सामंजस्याने मिटविला.    

बळीराम भाऊराव भोसले यांनी तलाठी यांचेकडे जमीन अदलाबदलीबाबत अर्ज दिला होता. अखेर तलाठी  सिरसेवाड यांनी शासनाच्या नवीन आदेशानुसार प्रत्यक्ष बांधावर जाऊन पाहणी करून रितसर सलोखा योजनेच्या अनुषंगाने अभिमान रामचंद्र भोसले व बळीराम भाऊराव भोसले या दोन्ही शेतकऱ्याला बोलावून आपसातील वादविवाद मिटवून पंचनामा केला.त्या पंचनाम्याच्या प्रतही त्यांना दिल्या. कळंब येथील नोंदणी ऑफिसमध्ये जाऊन दुय्यम निबंधक यांच्याकडे नोंदणी करून जमीनीचे अदलाबदल दस्त करून घेतले. अशा पध्दतीने सलोखा योजनेच्या माध्यमातून तलाठी सिरसेवाड यांनी शेतकऱ्यांचा बारा वर्षापासूनचा शेतीशी संबंधित जुना वाद मिटविला.विशेष म्हणजे कमी खर्चात या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळाल्यामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सलोखा योजनेचे काम जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, या योजनेच्या कामासाठी तलाठी सिरसेवाड यांना उपविभागीय अधिकारी संजय पाटील, नायब तहसीलदार मुस्तफा खोंदे, मोह्याचे महसूल मंडळ अधिकारी वैजनाथ माटे यांनीही सहकार्य केले.


 
Top