धाराशिव (प्रतिनिधी)-दिव्यांग बांधवांचे प्रशन सोडवण्यासाठी प्रामाणिकपणे सेवा देण्याच्या हेतूने “ दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी “ हे अभियान राबविले जात आहे. या अभियानादरम्यान माझ्यासोबत तज्ज्ञांची एक चमू आहे.दिव्यांगाच्या अर्ज,तक्रारी आणि प्रत्येक कागदाची जबाबदारीने दखल घेतली जात आहे. जिल्ह्यातील प्रत्येक दिव्यांगाला आवश्यक लाभ देणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. असे प्रतिपादन दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी केले.
आज 21 सप्टेंबर रोजी धाराशिव येथे दिव्यांग कल्याण विभागांतर्गत “ दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी “ या अभियानानिमित्त आयोजित मेळाव्यात उपस्थितांना संबोधित करतांना ते बोलत होते.यावेळी जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता,सहायक जिल्हाधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर, लातूर येथील समाज कल्याण विभागाचे विभागीय उपायुक्त अविनाश देवसटवार, जिल्हा समाज कल्याण अधिकारी सूर्यकांत भुजबळ,सहायक आयुक्त समाज कल्याण बाबासाहेब अरवत,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतिश हरिदास, मयूर काकडे,वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता भार्त कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
आमदार कडू बोलताना पुढे म्हणाले,दिव्यांगांसाठी युडीआयडी ओळखपत्र,रेशनकार्ड,घरकुल मिळवून देण्यात येत आहेत. दिव्यांगांच्या विकासासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून नाविन्यपूर्ण उपक्रम राबवावेत असे सांगून ते पुढे म्हणाले, दिव्यांगांच्या बचतगटांना उद्योग, शाळा,सहकारी संस्थांच्या माध्यमातून दिव्यांगांचा विकास साधत हा विभाग अधिक गतिशील बनवण्यासाठी सर्व विभागांनी सहकार्य करावे.असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
जिल्हाधिकारी डॉ.ओंबासे प्रास्ताविक करतांना म्हणाले, दिव्यांगांसाठी स्वतंत्र विभाग सुरु करणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य आहे. या ठिकाणी दिव्यांग बांधवांनी तयार केलेल्या आकर्षक वस्तूंच्या स्टॉल्सला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.शिबीरासाठी उपस्थित असलेल्या दिव्यांगांसाठी व्हिल चेअर,पाणी आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांची या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थिती होती.