धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र शासनाने बाह्य यंत्रणेकडून कामे करुन घेण्यासाठी सेवापुरवठादार संस्थेमार्फत भरती करण्यासाठी एजन्सींना मान्यता दिली आहे. बेरोजगारांच्या जखमेवर मीठ चोळणाऱ्या या शासन निर्णयाची युवा सेना, शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वतीने गुरूवारी (दि.21) शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात होळी करून राज्य सरकारचा निषेध केला.
खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील, शिवसेनेचे संपर्कप्रमुख मकरंद राजेनिंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले. कंत्राटी नोकरभरती रद्द झालीच पाहिजे, पन्नास खोके एकदम ओके, या सरकारचं करायचं काय - खाली मुंडकं वर पाय अशा घोषणा देण्यात आल्या. कंत्राटी भरतीचा शासननिर्णय रद्द करण्याची सदबुद्धी सरकारला मिळो म्हणून तीन गाढवांना विनवणी करण्यात आली.
राज्य सरकारने बाह्य यंत्रणेकडून कामे करुन घेण्यासाठी सेवापुरवठादार संस्था/एजन्सीचे पॅनल नियुक्ती करण्यासाठी मान्यता देण्याचा शासन निर्णय 6 सप्टेंबर रोजी जारी केला आहे. हा निर्णय सुशिक्षित बेरोजगारांवर अन्याय करणारा असल्यामुळे युवा सेना व शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वतीने गुरूवारी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये शासन निर्णयाची होळी करून निषेध व्यक्त करण्यात आला. सरकारने हा शासननिर्णय तत्काळ रद्द करण्याची मागणी केली. आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.
या आंदोलनात शिवसेनेचे शहरप्रमुख सोमनाथ गुरव, युवा सेना शहरप्रमुख रवि वाघमारे, उपशहरप्रमुख बंडू आदरकर, तुषार निंबाळकर, सुरेश गवळी, माजी शहरप्रमुख प्रवीण कोकाटे, पांडुरंग भोसले, पंकज पाटील, राणा बनसोडे, नाना घाडगे, नितीन शेरखाने, राकेश सूर्यवंशी, वैभव वीर, अभिराज कदम, विक्रम पाटील, गणेश साळुंके, पांडुरंग माने, जगदीश शिंदे, संकेत सूर्यवंशी, प्रशांत जगताप, रुपेश शेटे, मुजीब काझी, सय्यद साबेर, साजीद शेख, शिवप्रताप कोळी, पृथ्वीराज देडे, शरीफ शेख, नवज्योत शिंगाडे यांच्यासह शिवसैनिक, युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.