नळदुर्ग (प्रतिनिधी)- नळदुर्ग येथील बुद्धनगर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेअंतर्गत 52 लाख रुपये खर्च करून करण्यात आलेले रस्त्याचे काम निकृष्ठ दर्जाचे करणारा ठेकेदार व संबंधित नगरपालिकेच्या दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी या मागणीसाठी दि.11 सप्टेंबर रोजी दादासाहेब बनसोडे यांनी न.प.कार्यालयासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले. यावेळी शहरांतील विविध राजकीय पक्ष व संघटनांनी बनसोडे यांच्या उपोषणाला पाठींबा दिला आहे.
शहरातील बुद्धनगर येथे आठ महिन्यांपुर्वी शासकीय गोडाऊन ते जि. प.कन्या प्रशालेपर्यंत 52 लाख रुपये खर्चून सिमेंट रस्त्याचे काम करण्यात आले होते. मात्र संबंधित ठेकेदाराने हे काम अतीशय निकृष्ठ दर्जाचे केले असल्याने अवघ्या आठ महिन्यात या रस्त्याचे काम उखडले आहे त्यामुळे शासनाचे लाखो रुपये याठिकाणी अक्षरशा पाण्यात गेले आहेत.हे काम अतीशय निकृष्ठ दर्जाचे झालेले असतानाही नगरपालिकेने संबंधित ठेकेदाराला या कामाचे बील दिले आहे असे दादासाहेब बनसोडे यांनी म्हटले आहे.
लाखो रुपये खर्च करून तयार करण्यात आलेला रस्ता अवघ्या आठच महिन्यात उखडला जावा हा प्रकार अतीशय गंभीर आहे. याबाबत संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी आपण अनेकदा नगरपालिका प्रशासन, जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन केली आहे मात्र अद्याप याप्रकरणी कुठलीच कारवाई झाली नाही उलट निकृष्ठ दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदाराला पाठीशी घालण्याचा प्रयत्न होत आहे त्यामुळे मी नगरपालिकेचे या गंभीर प्रकरणाकडे लक्ष वेधण्यासाठी नगरपालिकेसमोर एक दिवसाच्या लाक्षणिक उपोषणास बसलो असल्याचे दादासाहेब बनसोडे यांनी म्हटले आहे. याप्रकरणी कारवाई न झाल्यास आपण नगरपालिका कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचेही दादासाहेब बनसोडे यांनी म्हटले आहे.बनसोडे यांनी सुरू केलेल्या उपोषणास शहरातील विविध राजकीय पक्ष व संघटनेच्या वतीने पाठिंबा देण्यात आला आहे.