नळदुर्ग (प्रतिनिधी) नळदुर्ग नगरपालिकेच्या गलथान व भोंगळ कारभारामुळे दि.11 सप्टेंबर रोजी शहरात दुषित पाण्याचा पुरवठा करण्यात आला आहे. केवळ पाणी शुद्ध करण्यासाठी लागणारे ब्लिचिंग पावडर संपल्याने हा गढूळ व दुषित पाणीपुरवठा झाला आहे. यामुळे शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नळदुर्ग नगरपालिका शहरात पाणी पुरवठा करण्यास सपशेल अपयशी ठरली आहे. आज शहरात आठ ते नऊ दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. हा प्रकार आजचा नाही तर गेल्या अनेक वर्षांपासुन बोरी धरण पाण्याने भरलेले असतानाही शहरात आठ दिवसाआड पाणीपुरवठा होतो हे नळदुर्गकरांच्या दृष्टीने अतीशय निंदनीय बाब आहे. शहर विकासाच्या गप्पा मारणारे नेते साधे शहरवासीयांना पिण्याचे पाणी वेळेवर पुरवठा करू शकत नाहीत. यावरून त्यांची कार्यतत्परता समजुन येते. म्हणुन नळदुर्गकरांनी फालतुक नेत्यांच्या मागे न लागता शहरांतील एक सक्षम व मजबुत नेतृत्व तयार करणे आज गरजेचे आहे.
नगरपालिकेला ब्लिचिंग पावडर व तुरटी पुरवठा करणारा ठेकेदार कोण आहे त्याची चौकशी करून त्याच्यावर नगरपालिका प्रशासनाने कडक कारवाई करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर पाणीपुवठ्याच्या कामात निष्काळजीपणा करून शहरांतील हजारो नागरीकांचे आरोग्य धोक्यात आणणाऱ्या नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे. एकतर शहरात आठ ते नऊ दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. अशातच असे दुषित आणि गढूळ पिण्याचे पाणी आठ दिवस कसे टिकणार? त्यामुळे या दुषित पाण्यामुळे नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सध्या नळदुर्ग शहरात डेंग्यु, पोट दुखणे, जुलाब होणे व तापाचे रुग्ण वाढत आहेत अशात अशा दुषित पाण्यामुळे हे आजार आणखी वाढण्याची शक्यता आहे.