धाराशिव (प्रतिनिधी)-ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे व ओबीसी समाजाची स्वतंत्र जातनिहाय गणना करावी या मागणीसाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने गुरूवारी (दि.21) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
समता परिषदेचे मराठवाडा अध्यक्ष आबासाहेब खोत यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन देण्यात आले. यावेळी बोलताना समता परिषदेचे मराठवाडा अध्यक्ष आबासाहेब खोत म्हणाले की, समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष छगनराव भुजबळ यांचा मराठा आरक्षणाला कोणत्याही प्रकारचा विरोध नाही. परंतु ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू नये अशी त्यांची भूमिका आहे. परंतु काहीजण भुजबळ हे मराठा आरक्षणाला विरोध करत असल्याच्या अफवा पसरवत आहेत. म्हणून अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने धरणे आंदोलन करुन ओबीसींचे आरक्षण अबाधित ठेवून मराठा समाजाला आरक्षण द्यावे अशी मागणी आम्ही करत असल्याचे त्यांनी सांगितले.
समता परिषदेचे मराठवाडा अध्यक्ष आबासाहेब खोत यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात बिभीषण खुणे, प्रशांत वेदपाठक, संतोष डोरले, डॉ.एन.एम. काझी, सचिन भोरेे, संतोष भाकरे, व्यंकट जाधव, अहमद शेख, शांतिलाल वाघे, तुषार जाधव, राजेंद्र जाधव, आदित्य घुगे, भजनदास जगताप, अशोक दणाणे, मोहन सुरवसे, राहुल बांगर, महादेव लोकरे, लक्ष्मण भानवसे यांच्यासह समता परिषदेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.