धाराशिव (प्रतिनिधी)- गटशिक्षण कार्यालयाप्रमाणे कर्मचाऱ्याचा युजर आयडी आणि पासवर्ड घेऊन ऑनलाईन स्लिप उपलब्ध करून घेण्यासाठी गटशिक्षण कार्यालय तसेच कर्मचारी यांच्या लॉगीनवर ऑनलाईन स्लिप उपलब्ध करून देण्यात याव्यात. जेणेकरून कर्मचाऱ्यांना जिल्हास्तरावरील वित्त विभागाकडे न जाता त्यांना गटशिक्षण कार्यालयस्तरावरच जीपीएफ स्लिप उपलब्ध होतील, अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीकोअर कमिटीचे चे नेते  कल्याण बेताळे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्यांना दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, आपल्या मुख्य लेखा व वित्त विभागाने महाराष्ट्र राज्यात तिसऱ्या क्रमाकांला सीएमपी लागू करून नंतर झेडपीएफएमएस प्रणालीद्वारे बजेट प्राप्त होताच जिल्ह्यातील सर्व शिक्षकांच्या खाती वेतन जमा करण्याचा उपक्रम अत्यंत प्रभावीपणे यशस्वी केला. त्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने आपला गौरवही केला आहे. तसेच सध्या जीपीएफची स्लिप ऑनलाईन देण्याबाबत आपल्या कार्यालयाकडे पूर्वीपासून सर्व यंत्रणा तयार असल्याचे तत्कालीन लेखा व वित्त अधिकारी यांनी समितीच्या शिष्टमंडळाला अवगत केले होते. यावर्षीच्या स्लिप वाटपानंतर यापुढे जीपीएफच्या स्लिप या गटशिक्षण कार्यालयाकडे युजर आयडी व पासवर्ड वापरून देण्यात येतील, असे सांगितले होते. त्यासाठी कर्मचाऱ्याचा युजर आयडी आणि पासवर्ड घेऊन गटशिक्षण कार्यालयाप्रमाणेच ऑनलाईन स्लिप उपलब्ध करून घेण्यासाठी गटशिक्षण कार्यालय तसेच कर्मचारी यांच्या लॉगीनवर ऑनलाईन स्लिप उपलब्ध करून देण्यात याव्यात. जेणेकरून कर्मचाऱ्यांना जिल्हास्तरावरील वित्त विभागाकडे न जाता त्यांना गटशिक्षण कार्यालयस्तरावरच जीपीएफ स्लिप उपलब्ध होतील. सदरील प्रणाली उपलब्ध असल्यामुळे पूर्वचर्चेप्रमाणे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांच्या उपस्थितीत या उपक्रमाचे कार्यान्वयन करण्यात यावे. सदरील प्रणाली कार्यान्वित करण्यासाठी कालमर्यादेत निर्णय होऊन एक गुड गव्हर्नस्‌‍‍ लागू करून वित्त विभागाच्या गौरवात भर टाकावी. त्याचबरोबर यापूर्वी सीएमपी वेतन प्रणालीची प्रभावी अंमलबजावणी करून पाच तारखेपर्यंत शिक्षकांना वेतनाचा लाभ दिल्याबद्दल मुख्य लेखा व वित्त विभागाचे आभारही समितीच्या वतीने व्यक्त करण्यात आले आहे.


 
Top