धाराशिव (प्रतिनिधी)- श्री गणरायाच्या गणेशोत्सवास मंगळवारी (दि. 19) मोठ्या उत्साहात प्रारंभ करण्यात आला. मुस्लिम समाजाचा ईद-ए-मिलाद सणही 28 सप्टेंबर रोजी आहे. त्या अनुषंगाने गणेशोत्सव व ई सणात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये यासाठी जिल्ह्यात 1978- अधिकारी, कर्मचाऱ्यांचा तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

अनंत चतुर्दशी उत्सव 28 सप्टेंबर रोजी आहे. याच दिवशी मुस्लीम धर्मियांचा ईद ए मिलाद हा सण गुरुवारी (दि. 28) आहे. श्री गणेश विसर्जन मिरवणुक व ईद ए मिलाद जुलुस मिरवणूक एकाच दिवशी येत असल्याने जिल्ह्यातील मुस्लीम बांधवानी ईद ए मिलाद जुलूस मिरवणूक एक दिवस नंतर काढण्याचा निर्णय स्वयंस्फुर्तीने घेतलेला आहे. मात्र याच अनुषंगाने धाराशिव जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली असून जिल्हा पोलीस दलाकडून गणेशोत्सव, ईद ए मिलाद अनुषंगाने गणेश मंडाळाचे पदाधिकारी यांच्या सोबत 539 बैठका घेतल्या आहेत. तसेच शांतता समितीच्या 173 बैठका, मोहल्ला समितीच्या 93 बैठका घेवून जिल्ह्यातील सण उत्सव शांततेत व सौहदपुर्ण वातावरणात पार पडावे या दृष्टीने बैठकी दरम्यान सर्वांना आवाहन करण्यात आलेले आहे.

जिल्ह्यातील 725 पेक्षा अधिक गुंड, उपद्रवी, गुन्हेगार वृत्तीचे लोकांविरुद्ध विविध कायद्याप्रमाणे प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली आहे. धाराशिव जिल्ह्यात सण उत्सव शांततेत

पार पाडण्यासाठी जमावबंदी व शस्त्रबंदी आदेश लागू करण्यात आलेले आहेत. श्री गणेश उत्सव व ईद ए मिलाद अनुषंगाने तगडा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. 90 पोलीस अधिकारी, 1 हजार 60 पोलीस अंमलदार, तसेच दंगल नियंत्रण 4 पथके, जलदप्रतिसादचे 2 पथके यासह अतिरिक्त मनुष्यबळ म्हणून एसआरपीएफ चे 2 प्लाटून तसेच 700 पुरुष व 75 महिला असे 775 गृहरक्षक दलाचे जवान तैनात करण्यात आलेले आहेत. गणेश उत्सवा दरम्यान उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांचा बक्षीसासह सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस विभागाकडून देण्यात आली आहे.


 
Top