नळदुर्ग (प्रतिनिधी)- बुद्ध विहाराचे होत असलेले विकास काम नागरीकांनी चांगल्या दर्जाचे करून घ्यावे. त्याचबरोबर चांगले काम होत असताना नाहक कुणी त्यामध्ये अडथळा आणण्याचे काम करू नये असे नळदुर्ग नगरपालिकेचे मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार यांनी या विकास कामांचा शुभारंभ करतांना म्हटले आहे.
नळदुर्ग नगरपालिकेच्या वतीने तब्बल 1 कोटी 21 लाख रुपये खर्च करून भीम नगर येथील पवित्र बुद्ध विहाराचे सुशोभीकरण करण्याबरोबरच याठिकाणी विविध विकास कामे करण्यात येणार आहेत. या कामांचा शुभारंभ दि.23 सप्टेंबर रोजी नगरपालिकेचे मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष उदय जगदाळे, नालंदा बुद्ध विहार मंडळाचे अध्यक्ष प्रा. शिवाजी बनसोडे, उपाध्यक्ष प्रकाश गायकवाड, शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष सुहास येडगे, पत्रकार विलास येडगे, तानाजी जाधव, अभियंता स्वप्निल काळे, बुद्ध विहाराचे प्रमुख सल्लागार बाबासाहेब बनसोडे, दुर्वास बनसोडे, माजी सैनिक पद्माकर पुजारी, सम्राट ग्रुपचे सुर्यकांत सुरवसे, विठ्ठल बापु बनसोडे, किशोर बनसोडे, महादेव कांबळे, राजरत्न बनसोडे, गणेश दुरुगकर, अक्षय कांबळे, गोरख कांबळे, सागर गायकवाड, बारक्या कांबळे, मुकेश कांबळे, अमोल कांबळे, तुषार गायकवाड, नगरपालिकेचे कार्यालयीन अधीक्षक दीपक कांबळे, पारस कन्स्ट्रक्शनचे सुपरवायझर सोनकांबळे आदीजन उपस्थित होते. प्रारंभी बुद्ध विहारात सर्व मान्यवरांच्या हस्ते महात्मा गौतम बुद्ध व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. यानंतर मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार,माजी नगराध्यक्ष उदय जगदाळे व इतर मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ फोडुन तसेच टिकाव मारून या कामांचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी बोलतांना मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार यांनी म्हटले की, बुद्ध विहाराच्या विकास कामासाठी 1 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध आहे.ही विकास कामे झाल्यानंतर एक सुसज्ज व पवित्र अशी वास्तु उभी राहणार आहे. या कामांमध्ये बुद्ध विहाराचे सुशोभीकरण करण्याबरोबरच याठिकाणी गार्डन, सभागृह व इतर अनेक विकासाची कामे होणार आहेत. येथील नागरीकांनी ही सर्व कामे चांगल्या दर्जाचे करून घ्यावे. कारण ही कामे दीर्घकाळ टिकणारी व्हावेत. चांगले काम करून घेण्याची जबाबदारी येथील नागरीकांची असली तरी चांगले काम होत असताना नाहक त्यामध्ये अडथळा आणण्याचे काम कुणी करू नये असेही यावेळी मुख्याधिकारी कुंभार यांनी म्हटले आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचलन बुद्ध विहाराचे सेक्रटरी तथा पत्रकार दादासाहेब बनसोडे यांनी केले आहे, या कार्यक्रमास नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.