तेर (प्रतिनिधी)-जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथील मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाच्या समर्थनात धाराशिव तालुक्यातील तेर येथील संजय जाधव, पांडुरंग मुळे, सोमनाथ आबदारे, गणेश देशमुख या आमरण उपोषणकर्त्यासह सखल मराठा समाज बांधवांच्या वतीने जुन्ये बसस्थानक येथून पदयात्रा काढून छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आमरण उपोषणाला प्रारंभ करण्यात आला.

शिक्षण आणि नोकरीत मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. अंतरवाली सराटी येथील मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू केलेल्या आंदोलनाचा आज पंधरावा दिवस आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी तेर येथील संजय जाधव, पांडुरंग मुळे, सोमनाथ आबदारे, गणेश देशमुख यांनी आमरण उपोषणाला मंगळवार दिनांक 12 सप्टेंबर पासून छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आमरण उपोषणाला प्रारंभ केला आहे .दरम्यान एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, कोण म्हणते देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही, छत्रपती शिवाजी महाराज की जय या घोषणांनी  परिसर दणाणून गेला होता. 

 मुंडन करून निषेध 

जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथील मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सुरू केलेल्या आंदोलनस्थळी पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीचार्ज तसेच मराठा समाजाला आरक्षण देण्यास दिरंगाई करणाऱ्या राज्य सरकारच्या निषेधार्थ तेर येथील बापू नाईकवाडी, अप्पासाहेब चौगुले, हिजु काझी, बाबुराव नाईकवाडी,  बाळासाहेब कानाडे, धनंजय आंधळे, सागर गोडसे, विठ्ठल कदम, अमर मुळे, विकास मुळे, सौरभ जाधव, गणेश चौगुले, आकाश नाईकवाडी, किरण नाईकवाडी, सोमनाथ अकुशे, गणेश नाईकवाडी, दत्ता वडवले, शंकर थोडसरे आदींनी मुंडन करुन सरकारचा निषेध केला.


 
Top