नळदुर्ग (प्रतिनिधी)- अयोध्या ते रामेश्वर पर्यंत ज्या, ज्या ठिकाणी श्री प्रभु रामचंद्र गेले त्याठिकाणी “श्रीराम स्तंभ“ उभारण्यात येणार आहे. नळदुर्ग येथील प्राचिन व ऐतिहासिक श्रीक्षेत्र रामतीर्थ येथे श्री प्रभु रामचंद्र यांचे वास्तव्य होते त्यामुळे श्रीक्षेत्र रामतीर्थ येथेही “श्रीराम स्तंभ“उभारण्यात येणार आहे. रामभक्तांसाठी ही आनंदाची व अभिमानाची बाब आहे.

श्री प्रभु रामचंद्र ज्यावेळेस  वनवासासाठी निघाले होते त्यावेळेस अयोध्या ते रामेश्वर पर्यंत एकुण 290 ठिकाणी ते गेल्याचे इतिहास तज्ञांनी, अभ्यासकांनी शोधुन काढले आहे. या वनवास दरम्यान श्री प्रभु रामचंद्र हे नळदुर्ग येथील प्राचिन श्रीक्षेत्र रामतीर्थ येथे आले असल्याचा उल्लेख आहे. श्री प्रभु रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेले हे श्रीक्षेत्र आहे. श्रीक्षेत्र रामतीर्थ येथे श्री प्रभु रामचंद्र मुक्कामी असताना त्यांना तहान लागल्यानंतर त्यांनी आपल्या धानुष्यातुन बाण मारून याठिकाणी पाणी काढलेअसल्याचे इतिहासात नमुद आहे. आजही ते ठिकाण अस्तित्वात असुन “रामडोह“ या नावाने ते ओळखले जाते. या रामडोहातील पाणी आरोग्यासाठी अतीशय लाभदायक व अनेक आजार बरे करणारे आहे.

श्री प्रभु रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या श्रीक्षेत्र रामतीर्थ येथे या मंदिराचे प्रमुख स्व. रघुवीर प्रसाद जोशी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने महंत  विष्णु प्रसाद शर्मा महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली विविध विकास कामे सुरू आहेत. या पवित्र ठिकाणी श्री प्रभु रामचंद्रांचे दर्शन घेण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने येतात.

श्री प्रभु रामचंद्र आपल्या वनवास काळात ज्या 290 ठिकाणी गेले होते त्या 290 ठिकाणी अशोक सिंहल फाउंडेशनच्या वतीने “श्रीराम स्तंभ“उभे करण्यात येणार आहेत. या 290 ठिकाणामध्ये नळदुर्ग येथील श्रीक्षेत्र रामतीर्थचा समावेश आहे. त्यामुळे श्रीक्षेत्र रामतीर्थ येथे श्रीराम स्तंभ उभारण्यात येणार आहे. हे श्रीराम स्तंभ सध्या अयोध्या येथे श्रीराम मंदिर उभारणीच्या कामात वापरण्यात येत असलेल्या गुलाबी दगडापासुन तयार करण्यात येणार आहेत. ज्याठिकाणी हे स्तंभ उभारण्यात येणार आहेत त्या स्तंभावर रामायणातील श्लोक लिहिले जाणार आहेत. हे श्लोक संस्कृत भाषेत लिहली जातील मात्र त्याचा अर्थ त्या, त्या भागांतील स्थानिक भाषेत लिहली जाणार आहेत. हा पवित्र “श्रीराम स्तंभ“नळदुर्ग येथील श्रीक्षेत्र रामतीर्थ येथे उभारल्यानंतर पवित्र,प्राचिन व श्रीप्रभु रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या श्रीक्षेत्र रामतीर्थचे महत्व आणखी वाढणार आहे हे रामभक्तांसाठी आनंदाची व अभिमानाची बाब आहे.

 

 
Top