धाराशिव (प्रतिनिधी)-अधून-मधून पावसाच्या सरी गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या उत्साह, मुक्तपणे गुलालाची उधळण, लेझीम, झाज, टिपरी आदी ढोल ताशांच्या आवाजावर खेळत शहरासह जिल्ह्यात उत्साहात व शांततेत श्री विसर्जन पार पडले. 

शहरासह जिल्ह्यात सकाळी 11 पासूनच श्री विसर्जन मिरवणुकीस काही ठिकाणी प्रारंभ झाला. धाराशिव शहरात हातलाई, श्री विसर्जन विहीर येथे मोठ्या गणेश मंडळांनी भव्य मिरवणुका काढून श्री विसर्जन केले. मिरवणुकीमध्ये लहान मुलापासून ते पन्नासी गाठणाऱ्या व्यक्तीपर्यंत लेझीम पथक, झाज पथक, ढोल पथक, वाघ्या मुरळी पथक, तुळजाभवानी गोंधळ पथक, टाळ पथक, आदिवाशी पथक आदी पथकात सहभाग नोंदविला. काही गणेश मंडळाच्या पथकात मुली व महिलांचाही समावेश होता. बाल हनुमान गणेश मंडळ, विजय चौक तरूण गणेश मंडळ, साई परिवार गणेश मंडळ, भागिरथी गणेश मंडळ, माऊली गणेश मंडळ, गणेशनगर गणेश मंडळ, महात्मा गांधी नगर गणेश मंडळ, अंबे तरूण गणेश मंडळ आदी गणेश मंडळाच्या मिरवणुका आकर्षक स्वरूपात निघाल्या. शहरातील काळा मारूती चौकात ठाकरे गटाच्या शिवसेनेचे व्यासपीठ, भाजप व शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे व्यासपीठ उभारून येणाऱ्या गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांच्या सत्कार करण्यात आला. 

धाराशिव नगर परिषदेच्यावतीने ज्या गणेश मंडळांना श्री गणेशाची मुर्ती विसर्जीत न करता वर्षभर ठेवायाची असेल तर त्यांची व्यवस्थाही नगर परिषदेच्या वतीने करण्यात आली होती. शहरासह जिल्ह्यात सर्वत्र पोलिस बंदोबस्त चोख होता. पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी श्री विसर्जन मिरवणुकीवर लक्ष ठेवून होते.


 
Top