तुळजापूर (प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याची बुद्धी महाराष्ट्र सरकारला मिळावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि पुजारी मंडळाच्या वतीने सोमवारी (दि.18) कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेला साकडे घालण्यात आले. महाद्वारसमोरील कासवाचे पूजन करुन महाआरती करुन सरकारला सदबुद्धी मिळावी म्हणून प्रार्थना करण्यात आली. 

छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत सरकारने घोषणांचा पाऊस पाडला. परंतु शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव, ज्वारी, तूर. सोयाबीनचा प्रश्न, पशुधनाचा प्रश्न, दुधाला दरवाढ, पिण्याचे पाणी अशा अनेक समस्या आहेत. पावसाने ओढ दिल्यामुळे  पिके वाया गेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना 25 टक्के अग्रीम मिळणे अपेक्षित होते. परंतु सरकारने याकडे दुर्लक्ष केले आहे. 

महाराष्ट्रातील सरकार हे मोसमाप्रमाणे बदलत आहे. एका वर्षात चारवेळा सरकार बदलत आहे. म्हणून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवून त्यांना दिलासा देण्याची सदबुद्धी सरकारला द्यावी यासाठी श्री तुळजाभवानी मातेच्या चरणी साकडे घातल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे यांनी सांगितले. यावेळी पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर गंगणे यांनीही सरकारच्या धोरणावर कडाडून टिका केली. 

यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजाभाऊ हाके, कल्याण भोसले, जिल्हा उपाध्यक्ष  धनाजी पेंदे, गुरु भोजने, अर्जुनअप्पा साळुंके, विजय सिरसट, संजय भोसले, मोहन भोसले, चंद्रकांत नरूळे, अण्णासाहेब साळुंके, विजय भोसले, अण्णा इंगळे, शंतनु जटाळ यांच्यासह पुजारी, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top