धाराशिव  (प्रतिनिधी) - हैदराबाद मुक्ती संग्रामात निजामाची जुलमी राजवट झुगारून देण्यासाठी अतुलनीय योगदान देणाऱ्या स्वातंत्र्य सेनानींचा व त्यांच्या वारस कुटुंबियांचा त्यांच्या घरी जाऊन स्वातंत्र्य सेनानींचे नाव व अमृत महोत्सव लोगो असलेली पाटी, टोपी, खादी शाल व पुष्पगुच्छ देऊन जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासे यांच्या हस्ते दि. 2 सप्टेंबर रोजी विशेष सन्मान व गौरव करण्यात आला. त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक स्वातंत्र्य सेनानींच्या घरी त्यांच्या नावाची पाटी झळकणार आहे.

हैद्राबाद संस्थानाची जुलमी राजवट व जोखडे झुगारुन देत स्वातंत्र्य सेनानींना अत्यंत कडवी झुंज दिली. यामध्ये अनेकांनी प्राणांची बाजी लावली. त्यामुळे हैद्राबाद संस्थानातून मराठवाडा मुक्त करणाऱ्या स्वातंत्र्य सेनानींचा सन्मान व यथोचित गौरव व्हावा यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाच्यावतीने हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी मुरलीधर रामचंद्र मसलेकर (भारतराव व लक्ष्मीबाई मसलेकर), जयकुमार फुलचंद अजमेरा, (आरती, राजकुमार व पदमकुमार अजमेरा), शेषराव नामदेव बनसोडे व पत्नी विजया बनसोडे, वसंत भगवान उंबरे (कलावती व मुलगी शीला, मुलगा भगवान) व बाबुराव नामदेव काकडे यांच्या पत्नी भागिरथीबाई यांचा यथोचित सन्मान करुन गौरविण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे, तहसिलदार डॉ शिवानंद बिडवे, महसूल सहाय्यक शुभम काळे, मंडळ अधिकारी श्रीनिवास पवार, चंद्रकांत जाधव, तलाठी श्रीधर माळी, कोतवाल श्रीकांत शेवाळे आदी उपस्थित होते.


 
Top