धाराशिव (प्रतिनिधी)- लोहारा तालुक्यातील हिप्परगा (रवा) येथे बहुउद्देशीय इमारत बांधकामासाठी विशेष बाब म्हणून रू. अडीच कोटीचा निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांच्याकडे केली आहे.

आ.सतीश चव्हाण यांनी मंगळवारी मंत्रालयात अजितदादा पवार यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना यासंदर्भात पत्र दिले. आ.सतीश चव्हाण यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, हिप्परगा (रवा) हे गाव मराठवाडा मुक्ती संग्राम  चळवळीचे प्रमुख ठिकाण होते. स्वामी रामानंद तीर्थ यांनी 1921 साली येथे राष्ट्रीय शाळेची स्थापना करून अनेक स्वातंत्र्य योध्दे तयार करण्याचे काम केले. येथूनच मराठवाडा मुक्ती संग्रामाची बीजे पेरली गेली. मात्र प्रशासनाच्या उदासिनतेमुळे हे ठिकाण दुर्लक्षीत राहिले असल्याचे आ.सतीश चव्हाण यांनी अजित पवार यांच्या निदर्शनास आणून दिले. या ठिकाणी स्वातंत्र्य सैनिकांनी व गावकऱ्यांनी मिळून एक स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मरणात व राष्ट्रीय शाळेची आठवण म्हणून एक स्तंभ बांधलेला आहे. 17 सप्टेंबर रोजी सांस्कृतिक कार्यक्रमासह या दिवशी विविध सामाजिक संघटना, स्वातंत्र्य सैनिक व त्यांचे वारस त्या स्तंभास अभिवादन करण्यासाठी येतात. मात्र 17 सप्टेंबर हा कालावधी पावसाळी ऋतुत येत असल्यामुळे कार्यक्रम घेण्यासाठी अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याचे आ.सतीश चव्हाण यांनी सांगितले.

मराठवाडा मुक्ती संग्रामाचा इतिहास भावी पिढीला समजावा यासाठी याठिकाणी सांस्कृतिक सभागृह व म्युझियम/वस्तुसंग्रहालय तसेच विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज असे ग्रंथालय व अभ्यासिका एकाच छताखाली व्हावी यासाठी जुन्या शाळेचे निर्लेखन करून ती जागा या इमारतीसाठी उपलब्ध झालेली आहे. अशा बहुउद्देशीय इमारतीसाठी विशेष बाब म्हणून रू.अडीच कोटीचा निधी उपलब्ध करून द्यावा अशी आग्रही मागणी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे केली असल्याचे आ.सतीश चव्हाण यांनी सांगितले.


 
Top