धाराशिव (प्रतिनिधी) - बाकीच्या गुळ पेट्यासारखा एन.व्ही.पी. शुगर प्रा. लि., या कारखान्याचा भाव राहणार नाही. कारण हा कारखाना शेतकऱ्यांना केंद्र बिंदू मानून काम करणारा आहे. त्यामुळे या कारखान्याचे कामकाज बघून बाकीच्या गुळ पेट्या चांगले काम करतील, असा विश्वास खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी दि.24 सप्टेंबर रोजी व्यक्त केला. दरम्यान, ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उसाला प्रती टन 2 हजार 700 रुपये भाव देणार असल्याची घोषणा त्यांनी केली.
धाराशिव तालुक्यातील जागजी येथील एन.व्ही.पी. शुगर प्रा. लि., या कारखान्याच्या चाचणी गळीत हंगामाचा शुभारंभ उसाची मोळी टाकून खासदार आमेराजेनिंबाळकर यांच्या उपस्थितीत करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जागजी येथील रंगनाथराव सावंत गुरुजी, हभप नवनाथ महाराज चिखलीकर, हनुमंतराव देशमुख, हभप काकासाहेब डांगे, तानाजी मगर, भारत लोमटे, सुभाष पाटील, अभिजीत मगर, सुधाकर साळुंखे, आत्माराम सरडे, अनुरथ भोसले, तुळशीदास जमाले, काकासाहेब मिसाळ, जहाँगीर सय्यद, बाबासाहेब शिंदे, कुलदीप पाटील (विटेकर), हिम्मतराव पाटील, सचिन शिंदे व सोमनाथ जानते, आप्पासाहेब पाटील, धनंजय पाटील व संस्थापक अध्यक्ष नानासाहेब पाटील आदी उपस्थित होते.
तर नानासाहेब पाटील म्हणाले की, दि.22 सप्टेंबर 2022 या कारखान्याचे वडील व्यंकटराव पाटील यांच्या हस्ते उद्घाटन केले. तर उसाची मोळी टाकण्याचा कार्यक्रम एक वर्षाने केला. मात्र या कार्यक्रमास वडील व आई दोघेही हयात नाहीत. तसेच खासदार राजेनिंबाळकर यांचे कर्तुत्व पाहायला त्यांचे देखील वडील हयात नाहीत. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात ध्येय असते की आपण केलेले काम बघायला आपले आई-वडील असावेत अशी अपेक्षा असते असे त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन दौलत निपाणीकर यांनी तर उपस्थितांचे आभार नानासाहेब पाटील यांनी मानले. यावेळी शेतकरी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.