धाराशिव (प्रतिनिधी)- सरकार युवकांची परिक्षा फी व प्रक्रियेवरुन एकप्रकारे थट्टा करीत असल्याची टिका करून तलाठी परिक्षाची फी एक हजार रुपये केली. भाजपचे मंत्री सुधीर मुनगंठीवार 600 रुपये फि असल्याच्या कारणावरुन सभागृहात पोटतिडकीने विद्यार्थ्यांची बाजु घेत होते. पण सत्तेच्या खुर्चीत बसल्यानंतर भाजपच्या राज्याचे प्रमुख नेते एक हजार रुपये फि केल्याचे समर्थन करत आहेत अशी घणाघाती टिका शिवसेना ठाकरे गटाचे खा. ओमराजेनिंबाळकर यांनी केली. यावेळी आमदार कैलास पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
धाराशिव शहर व तालुक्यासह जिल्ह्यातील बेरोजगारांसाठी शिवसेनेच्यावतीने रोजगार मेळाव्याचे आयोजन केले होते. खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नोकरी महोत्सव आयोजित केला. महोत्सवात महाराष्ट्रातील 35 कंपन्यांमार्फत बेरोजगार युवक, युवतीची पात्रतेनुसार निवड करण्यात आली आहे. तब्बल नऊशे तीस विद्यार्थ्यांना त्याच ठिकाणी नोकरीचा लाभ दिल्याने हा उपक्रम अत्यंत यशस्वी ठरला आहे.
या कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील यांच्या उपस्थितीत पुष्पक मंगल कार्यालय येथे पार पडला.
आमदार कैलास पाटील म्हणाले की, सरकारी नोकरी कमी होत आहेत. सरकार सगळ्याच विभागामध्ये खाजगीकरणाचा घाट घालत आहे. त्यामुळे आता आपणही खाजगी कंपनीच्या नोकरी मिळविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यामुळे भविष्यात अशा कंपन्याही येथे याव्यात यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार पाटील यानी यावेळी सांगितले.
यावेळी युवासेना सचिव अक्षय ढोबळे, युवतीसेना सचिव मनीषाताई वाघमारे, तालुकाप्रमुख सतीश सोमानी, विकास मोळवणे, शहरप्रमुख सोमनाथ गुरव तसेच शिवसेना, युवासेनाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.