धाराशिव (प्रतिनिधी)-भारतीय जनता पार्टी अनुसुचित जाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्रतिष्ठान भवन (भाजपा कार्यालय) येथे संघटनात्मक बैठक संपन्न झाली. यावेळी भारतीय जनता पार्टी अनुसुचित जाती मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष पदी निवड झाल्याबदल दिलीप कांबळे यांचा आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा भाजपच्या वतीने सत्कार करुन शुभेच्छा देण्यात आल्या.  

देशातील दलित, वंचित, शोषित आणि अपेक्षित समाजासाठी देशातील केंद्र सरकारचे मोठे योगदान असल्याचे मत दिलीप कांबळे यांनी यावेळी व्यक्त केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दलित, वंचित, शोषित आणि उपेक्षित, आदिवासी समाजासाठी लोककल्याणकारी योजना राबवल्या, तरुणांना उधोग, व्यवसायासाठी विविध शासकीय योजनांतुन कर्ज उपलब्ध करुन दिले जात आहे. प्रधानमंत्री आवास योजनेतुन देशभरात तीन कोटी पेक्षा जास्त घरे उपलब्ध झाली आहेत. तसेच रमाई आवास योजनेतुन देखील असंख्य लोकांना घरकुलाचा लाभ मिळत आहे. केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजनातुन देशातील गरिबांना दारिद्रयरेषेतुन बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जात आहे असेही त्यांनी सांगितले.

पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, इतर नेते मंडळी फुले शाहू आंबेडकरांचा वारसा सांगतात केवळ त्यांच्या नावाचा वापर मताचे राजकारण करण्यासाठी करतात परंतु भारतीय जनता पार्टी खरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची वारसदार आहे. याचे उदाहरण देत असताना त्यांनी सांगितले की, मी महाराष्ट्र राज्याचा सामाजिक न्याय मंत्री असताना इंग्लंड मध्ये पदवीसाठी शिक्षण घेत असताना ज्या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर वास्तव्यास होते ते घर तत्कालीन फडणवीस सरकारने विकत घेतले तसेच अण्णाभाऊ साठे स्मारक, लहुजी साळवे स्मारक हे सर्व विषय मार्गी लावण्याचे कार्य फक्त भारतीय जनता पार्टी करू शकते असे ही ते म्हणाले.

माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिताताई कांबळे यांचीही उपस्थितांना मार्गदर्शन लाभले. यावेळी, अनुसुचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष प्रविण सिरसाठे, दत्ता पेठे, सचिन लोंढे, विधा माने, अमोल पेठे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने  उपस्थित होते.


 
Top