धाराशिव (प्रतिनिधी)- राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार दिनांक 09 सप्टेंबर, 2023 रोजी संपूर्ण उस्मानाबाद जिल्हयामध्ये राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले. उस्मानाबाद मुख्यालयाच्या ठिकाणी सकाळी ठिक 10.30 वाजता प्रत्यक्ष लोक अदालतीच्या कामकाजाची सुरवात झाली. या लोक अदालतीमध्ये पॅनल क्र. 01 वर मा. श्री. आर. एस. गुप्ता, पॅनल प्रमुख यांच्या न्यायालयामध्ये मोटार अपघात प्रकरण क्रमांक 34/2021 या ज्योती विरुध्द या प्रकरणामध्ये तडजोडीने रुपये 32,00,000/- (अक्षरी रुपये बत्तीस लाख फक्त) मध्ये सदर प्रकरण मिटले. “सदर प्रकरणातील अर्जदार महिला ही वयोवृध्द असल्यामुळे श्रीमती. अंजू एस. शेंडे, प्रमुख जिल्हा न्यायाधीश, उस्मानाबाद व पॅनल प्रमुख श्री. आर. एस. गुप्ता हे पहिल्या मजल्यावरून खाली येवून सदर वृध्द महिलेस रुपये 32,00,000/- चा धनादेश सुपूर्द केला“ हे या लोक अदालतीचे खास आकर्षण ठरले. सदरच्या प्रकरणामध्ये अर्जदारांच्या वतीने विधीज्ञ एम. बी. माढेकर तर विमा कंपनीच्या वतीने अजित दानवे व एस. पी. दानवे यांनी काम पाहिले. तसेच मोटार अपघात प्रकरण क्रमांक 103/2023 मध्ये रुपये 1,60,00/- मोटार अपघात प्रकरण क्रमांक 119 / 2023 मध्ये रुपये 9,00,000/- व मोटार अपघात प्रकरण क्रमांक 19/2023 मध्ये 10,00,000/- इतक्या रक्कमेची तडजोड करण्यात आली. सदरची तीन प्रकरणे ही साधारणपणे दाखल केल्यापासून सहा महिन्याच्या आत निकाली काढण्यात या लोक अदालतीमुळे शक्य झाले.