तुळजापूर (प्रतिनिधी)- साहेब शेत हिरवेगार दिसतय पण सोयाबीन शेंगात दाणाच भरला नाही. कापणी खर्च ही निघणे मुष्कील आहे, ना अग्रीम विमा नाही ना दुष्काळ जाहीर होत नाही जगावे कसे अशी व्यथा तुळजापूर खुर्द येथील भोजणे नावाचा शेतकऱ्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष तथा माजी खासदार राजू शेट्टी यांच्या समोर मांडताच अग्रीम पिकविमा मिळवुन देणे व दुष्काळ सवलती मिळवुन देण्यासाठी आम्ही लढु अशी ग्वाही दिली.
स्वाभीमानी शेतकरी संघटना अध्यक्ष राजु शेट्टी हे धाराशिव जिल्हा दुष्काळ पाहणी दौऱ्यावर शुक्रवार आले असता सकाळी थेट शेतकऱ्यांच्या शेतात जावुन सोयाबीन पिकाची पाहणी केली. शेत हिरवेगर, दिसले पण शेंगात दाणे भरले नसल्याचे दिसुन आले. शासनाने दुष्काळाची दाहकता काय आहे हे शेतात येवुन पाहवे नंतर लक्षात येईल असे यावेळी म्हणाले. यंदा पेरणी, उगवणी व सोयाबीन फुलो-यात आले कि वरुन राजाने ओढ दिल्याने माल लागला नाही. कापणी ही परवडणार नाही त्यामुळे शासनाने या भागात दुष्काळ उपाययोजना करण्याची मागणी करुन जिल्हाधिकारी यांना भेटणार असल्याचे स्पष्ट केले.
शुक्रवारी धाराशिव जिल्हा दुष्काळी दौरा केला, तुळजापूर, धाराशिव, कळंब तालुक्यात विविध ठिकाणी बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली व तसेच मराठवाड्यामध्ये सध्या दुष्काळाची जी परिस्थिती उद्भवली आहे आणि या परिस्थितीची दाहकता किती मोठ्या प्रमाणात आहे हे सरकार दरबारी मांडण्याचे काम करणार असल्याचे सांगुन लवकरच मराठवाडा दुष्काळ जाहीर करून वंचित गोरगरीब शेतकरी यांना न्याय मिळवून देण्याचे काम करतील अशी ग्वाही शेतकऱ्यांना दिली. त्याचबरोबर अग्रीम विमा मंजूर होऊन सुद्धा अजून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कोणत्याही प्रकारचा निधी जमा झालेला नाही. यावेळी राजू शेट्टी यांनी शासनाला इशारा दिला की तात्काळ अग्रीन विमा अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावे अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना शांत बसणार नाही. या पुढील काळात तीव्र प्रकारचे आंदोलन करण्यात येतील.
तसेच येणाऱ्या काळामध्ये धाराशिव जिल्ह्यात नगरपालिका तसेच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लढवणार असल्याचे यावेळी राजू शेट्टी यांनी सांगितले. त्यानंतर कृषी उत्पन्न समिती कळंब येथे बाजार समितीच्या सर्वसाधारण वार्षिक बैठकीस उपस्थित राहून उपस्थित शेतकरी व व्यापारी यांना मार्गदर्शन केले व केज येथे मराठवाडा दुष्काळ आक्रोश मेळावा सभेसाठी रवाना झाले.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटना धाराशिव जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे,संदीप राजोबा उपाध्यक्ष धनाजी पेंदे, जिल्हा संपर्कप्रमुख शहाजी सोमवंशी, राजाभाऊ हाके, तालुकाध्यक्ष दुर्वास भोजने, तालुका पक्षाध्यक्ष नेताजी जमदाडे, विजय शिरसट, संतोष भोजने, बाळासाहेब मडके, रत्नेश घाटे, नेपते आबा, आदिनाथ काळे इत्यादी. कार्यकर्ते व मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.