धाराशिव (प्रतिनिधी) - मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आमचा शेवटचा प्रयत्न असून मराठा समाजाची पुढची पिढी तुम्ही आमच्यासाठी काय केले ? असे विचारल्याशिवाय राहणार नाही. तसेच आरक्षण मिळाले नाही तर पुढची पिढी आम्हाला जगू देणार नाही. त्यामुळे जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही. तोपर्यंत आम्ही लढाई सोडणार नाही. ते या काळातच होईल व ते आम्ही केल्याशिवाय राहणार नाही आणि गप्पही बसणार नसल्याचा खणखणीत इशारा माजी मंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकरराव चव्हाण यांनी दि.8 सप्टेंबर रोजी सरकारला दिला.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथील मनोज जरांगे-पाटील यांच्या सुरू असलेल्या आमरण उपोषणास पाठिंबा देण्यासाठी धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निलेश साळुंके व अक्षय नाईकवाडी यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. यावेळी माजी मंत्री मधुकरराव चव्हाण व शिवसेना (ठाकरे) चे आमदार कैलास पाटील यांनी उपोषणस्थळी भेट देऊन आंदोलनास पाठिंबा दिला. त्यावेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 

पुढे बोलताना चव्हाण म्हणाले की, मराठा आरक्षणासाठी यापूर्वी मूक मोर्चा लाखोच्या संख्येने काढले. त्यावेळी पोलिसांनी मोर्चातील कुणालाही हात लावला नाही. तर आता मनोज जरांगे पाटील हे उपोषण करत असताना त्यांना महिला व इतर नागरिकांनी पाठिंबा दिला.  त्यामुळे त्या आंदोलकांना उठविण्यासाठी पोलिसांनी लाठी चार्ज केला. हा हल्ला सरकारच्या आदेशाशिवाय होऊच शकत नसल्याचा आरोप त्यांनी केला. कारण आम्ही देखील 25 वर्षे उपसभापती, सभापती, मंत्री म्हणून सरकारमध्ये कामकाज केलेले आहे. त्यामुळे असे प्रकार सरकारच्या आदेशाशिवाय होत नसल्याचे सांगत सरकारवर निशाणा साधला. तसेच सरकार आता चर्चा करीत आहे की, सौम्य लाठी हल्ला केला म्हणून असे सांगत लाटी हल्ला हा लाटी हल्लाच असतो असा पलटवार देखील त्यांनी केला. तुळजापूर मध्ये अशाच लाठी हल्ल्यामध्ये एका भिक्षुकाचा मृत्यू झाला होता. त्यावेळी संबंधित पोलीस अधिकाऱ्याला निलंबित केले होते. तर आता केलेल्या हल्ल्यामध्ये संबंधित अधिकाऱ्याला सक्तीच्या रजेवर पाठविणे म्हणजे त्याच्यावर प्रेम केल्यासारखेच असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.  याप्रकरणी सरकारच दोषी असल्याचे आरोपीही त्यांनी केला. मात्र आरक्षण मिळेपर्यंत कुणालाही त्रास होऊ नये, जाळपोळ न करता व रास्त मार्गाने आंदोलन करावे, असे आवाहन त्यांनी केले. 

तर आ कैलास पाटील म्हणाले की, आजपर्यंत मराठा आरक्षणवरून सरकार मराठा समाजाची धुळफेक करीत असून हे अत्यंत चुकीचे आहे. मात्र ती धुळफेक आता खपवून घेतली जाणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला. तसेच लाठी चार्ज कोणाच्या आदेशाने झाला आहे ? हे सरकारने जनतेला सांगावे, असा सवाल उपस्थित केला. तर आरक्षण देण्यासाठी सरकारने जे परिपत्रक काढले आहे. त्यामध्ये शब्दांचा खेळ केला असून तो शब्दांचा खेळ न करता मराठा समाजाला आरक्षण द्यावे अशी मागणी आ पाटील यांनी केली. यावेळी मराठा समाजाचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलक रस्त्यावर बसल्यामुळे वाहतूक एक मार्गी करण्यात आली होती. तर दिवसभर आंदोलन स्थळी विविध पक्ष, संघटना व नागरिकांनी भेट देऊन पाठिंबा देत या आंदोलकांना प्रोत्साहन दिले.


 
Top